भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण – कल्याण, डोंबिवली भागातील हवेतील विविध घटकांची गुणवत्ता आणि ध्वनी प्रदूषणाची माहिती नागरिकांना नियमित मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने अखेर प्रयत्न सुरु केले आहेत. कल्याण डोंबिवली शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवा, ध्वनी गुणवत्ता दर्शक यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. मुंबई तसेच महानगर पट्टयातील शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांची लगबग सुरु झाली आहे.
अशाप्रकारचे दोन दर्शक यंत्रणा कल्याण मध्ये चिकणघर भागातील ब प्रभाग कार्यालय भागात, डोंबिवली एमआयडीसीत नुकतेच लावण्यात आले आहेत. असे असले तरी या दर्शक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी मात्र या यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. कल्याण, डोंबिवली परिसरात औद्योगिक क्षेत्र आहे. शहर परिसरात महापालिकेसह एमएमआरडीए, एमएमआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागांकडून काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु आहेत. या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे, बांधून तयार झालेल्या रस्त्यांवरून अतिसक्ष्मू धुलिकण हवेत उडत आहेत. डोंबिवली, कल्याण डोंबिवली नवीन गृहप्रकल्प सुरू आहेत. जुन्या इमारती पुनर्विकासासाठी पाडताना मोठ्या प्रमाणात धुलीकण हवेत उडत आहेत. विकसक तसेच वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांवरही पुरेशा प्रमाणात प्रदुषण नियंत्रणासंबंधी खबरदारी घेतली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील हवेची गुणवत्ता पातळी मागील काही दिवसांपासून खालवत आहे.
आणखी वाचा-ठाणे : पर्यावरणपूरक फटाके खरेदीला नागरिकांची पसंती
यंत्रणा कामाला लागल्या
मुंबईसह महानगर पटयातील शहरांमधील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा सतत चर्चेत असताना महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील हवा, ध्वनीची गुणवत्ता चांगली राहिल तसेच नागरिकांना दररोज हवेतील घटकांची माहिती मिळावी यासाठी अखेर प्रयत्न सुरु केले आहेत. महापालिकेच्या नगररचनाकार सचीन घुटे, शशिम केदार यांनी महापालिका पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना २० बाय २० फूट आकाराच्या डोंबिवली, कल्याण मधील काही मोकळ्या जागा दाखविल्या. यामध्ये हवा गुणवत्ता दर्शक यंत्रणेसाठी कल्याण पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील घरडा सर्कल चौक आणि डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावरील आनंदनगर उद्यानाची जागा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी निश्चित केल्या. ध्वनी गुणवत्ता दर्शक यंत्रणेसाठी कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील पालिकेची शाळा, कल्याण मधील पालिका मुख्यालय निश्चित करण्यात आले. या जागांमध्ये २० बाय २० आकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यंंत्रणा उभी केली जाणार आहे. हवेतील ऑक्सिजन, कार्बड डायऑक्साईड, नायट्रोजन अशा विविध घटकांची माहिती, त्याचे हवेतील प्रमाण दर्शक फलकावर नागरिकांना नियमित पाहण्यास मिळेल, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.
“ हवा, ध्वनी गुणवत्ता दर्शक यंत्रणेसाठी पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभागाला डोंबिवली, कल्याण शहरात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. हवेतील विविध घटकांची माहिती, ध्वनी प्रमाणाची माहिती नागरिकांनी दैनंदिन उपलब्ध होईल.” -रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, कडोंमपा.
“ हवा, ध्वनी दर्शक यंत्रणा शहरात पाच ठिकाणी प्रस्तावित आहे. तीन यंत्रणा यापूर्वी कार्यरत आहेत. वाणिज्य, निवासी भागात ही यंत्रणा बसविली जात आहे.” -उपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, कल्याण.