युरोपियन श्वानप्रेमींच्या अधिक पसंतीस पडणारा, इतर श्वानांपेक्षा रूपाने वेगळा, लढवय्या योद्धय़ाची वृत्ती असणारा आत्मविश्वासू, रॉटवायलर आणि जर्मन शेफर्ड यांच्यासारख्या प्रजातीएवढे बलवान इत्यादी वैशिष्टय़े आढळणाऱ्या या श्वानाचे नाव एअर डेल टेरीअर असे आहे. इंग्लंडमधील एअर नावाच्या नदीजवळ आणि डेल म्हणजे डोंगराळ भागात आढळल्याने या श्वानांना एअर डेल टेरीअर असे नाव पडले.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये या श्वानांचा शोध लागला. साधारणत: १८८६ मध्ये इंग्लंडमध्ये या श्वानाची नोंद घेण्यात आली. पुढे १९०६ मध्ये या एअर डेल टेरिअरचा जगभरात प्रसार झाला. वेल्स टेरीअर आणि ऑटर हाऊंड या दोन प्रजातींच्या एकत्रीकरणातून श्वानांची ही प्रजात अस्तित्वात आली. खरेतर इंग्रजांनी केलेल्या भारतावरील आक्रमणांच्या वेळी श्वानांची ही प्रजात इंग्रजांसोबतच भारतात दाखल झाली. पुढे भारतात त्यांना पोषक ठरणारे थंड वातावरण न मिळाल्याने या प्रजातीचा येथील आढळ कमी झाला. रिचर्डसन यांनी या श्वानांच्या प्रशिक्षणाची सुरुवात केली. त्यांनी या श्वानांचा वापर युद्धजन्य परिस्थितीत निरोपाच्या देवाणघेवाणीसाठी तसेच युद्धाच्यावेळी जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेण्याच्या बाबतीतले प्रशिक्षण दिले. रेडक्रॉस या संघटनेने या श्वानांचा उपरोक्त कार्यासाठी युद्धजन्य परिस्थितीत शुश्रूषेसाठी वापर केला. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान या श्वानांचा समावेश इंग्लंडच्या सैन्यात करण्यात आला होता. या श्वानांना ‘वॉर डॉग’ या नावानेही संबोधले जाते.
पाठीवर काळे पट्टे आणि पूर्ण शरीर तांबूस रंगाचे असणाऱ्या या श्वानांचे वजन साधारणत: वीस ते तीस किलो असते. या श्वानाची उंची २३ ते २४ इंच असते. या श्वानांचे केस काळेभोर आणि कुरळे असतात. त्यांच्या केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण त्यांचे केस कुरळे असल्याने त्यांचा गुंता होण्याची शक्यता असते. म्हणूनच या श्वानांचे केस व्यवस्थित विंचरावे लागतात. गुंता झाल्यास या श्वानांना त्याचा त्रास होतो व ते चिडचिड करतात. या श्वानांना सतत कुठल्या न कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवावे लागते. त्यांना सतत उत्साही ठेवणे गरजेचे असते. एके ठिकाणी शांत बसणे हा त्यांचा मुळात स्वभाव नसल्याने त्यांच्या मालकाला सतत सतर्क राहावे लागते. या श्वानांची चिडचिड वाढल्यास ती मालकासाठी धोकादायक ठरू शकते. एअर डेल टेरीअरचे आयुर्मान साधारणपणे १२ ते १४ वर्षे एवढे असते. सतत चालणे, व्यायाम करवून घेणे, व्यवस्थित आणि भरपूर आहार देणे या गोष्टी या श्वानांच्या बाबतीत अगदी व्यवस्थित पाळल्यास हे श्वान अगदी तंदुरुस्त राहतात.
या श्वानांना योग्य प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरते. रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांसोबत आजही या श्वानांचा युरोपमध्ये उपयोग केला जातो. भारतात वास्तव्य असताना पारसी आणि अँग्लो इंडियन्स यांच्याकडे हे श्वान आढळून येत असत. या श्वानांचे पालनपोषण करणे त्यावेळी प्रतिष्ठेचे मानले जायचे. एअर डेल टेरीअर हे श्वान ज्या लोकांकडे असायचे त्यांचा समाजात एक वेगळाच दरारा असायचा. इंग्लंड आणि भारतात या श्वानांचा उपयोग शिकारीसाठी केला जायचा. शिकारीसोबतच शस्त्रसाठय़ाच्या गोदामांचे व मोठमोठी शिवारे, शेती यांचे रक्षण तसेच गायी-गुरांच्या गोठय़ांच्या रक्षणाचे कार्यही त्यांच्यावर सोपवले जायचे.
जमिनीवरील तसेच पाण्यातील शिकार करण्यास या प्राण्यांना अतिशय आवडते. ऑटोर हा प्राणी दिसताच हे श्वान त्या प्राण्याच्या मागे लागतात आणि कसलीही तमा न बाळगता पाण्यात उडी मारतात. हे श्वान घराचीही उत्तम राखण करू शकतात, परंतु त्यासाठी घर हवेशीर असावे लागते. या श्वानांना जर घरात पाळायचे असेल तर मालकाला आपले वर्चस्व दाखवावे लागते. या श्वानाच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागते. कोणत्याही प्रकारचा आजार यांना सहसा होत नाही, परंतु त्यांच्या केसांची खास निगा राखावी लागते. भारतातील यांचा आढळ कमी असल्याने याचे ब्रीडिंग जरी कमी होत असले, तरीही जपानमधील सैन्यदलात या श्वानांना सामील करून घेण्यात आले आहे.
पेट टॉक : एअर डेल टेरीअर युद्धभूमीवरील सैनिक
भारतात त्यांना पोषक ठरणारे थंड वातावरण न मिळाल्याने या प्रजातीचा येथील आढळ कमी झाला.
Written by किन्नरी जाधव
First published on: 09-08-2016 at 02:35 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airedale terrier dog