ऐरोली-काटई मार्गासाठी पहिली निविदा प्रकिया पूर्ण;पहिल्या टप्प्यातील खर्चात १०० कोटींच्या वाढीची शक्यता
ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथून डोंबिवलीलगतच्या काटई नाक्यापर्यंतचा प्रवास वेगाने व्हावा, यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखलेल्या उन्नत मार्गाचा प्रकल्प आतापासूनच महागडा ठरण्याची चिन्हे आहेत. ऐरोलीपासून राष्ट्रीय महामार्ग-४ पर्यंत सुमारे २.३९० किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी तब्बल १४५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील उभारणीचा खर्च १०० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र सुमारे १२.३ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ९४२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आवाक्यात असेल, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते, उड्डाणपुलांचे जाळे सक्षम व्हावे यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विविध प्रकल्पांमध्ये ऐरोली ते काटई नाका या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत महापे-शिळ-डोंबिवली-कल्याण या मार्गावरील वाहतुकीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून तुलनेने येथील रस्त्यांचे पुरेशा प्रमाणात रुंदीकरण करण्यात आलेले नाही. मुंबई, ठाण्यातील मोठय़ा बिल्डरांचे गृहप्रकल्प या मार्गालगत उभे राहात असल्याने भविष्यात शिळ-कल्याण मार्गावरील वाहनकोंडीत भर पडणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांच्या संख्येतही गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. यावर उतारा म्हणून घणसोली-रबाळे-महापे चौक दरम्यान वेगवेगळ्या उड्डाणपुलांच्या उभारणीचे कामही सध्या जोरात सुरू आहे. ही कामे करत असताना ठाणे-बेलापूर मार्ग ते शिळ-कल्याण मार्गावरील काटई नाक्यापर्यत उन्नत मार्ग उभारणीचे काम सुरूकरण्याचा निर्णय महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून या कामाचा पहिला टप्प्याची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोलीलगत असलेला पारसिक डोंगर फोडून त्यामधून बोगदा काढून हा उन्नत मार्ग शिळ-कल्याणमार्गे थेट काटई नाक्यापर्यत नेण्यात येणार आहे. तब्बल १२.३ किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी ९४२ कोटी रुपयांचा मोठा खर्च करण्याचा निर्णय महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार ३.५० किमी अंतराचा पहिला टप्पा आधी पूर्ण करण्यात येणार आहे. या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथून पारसिक डोंगरापलीकडे असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-४ पर्यंत उड्डाणपूल तसेच बोगदा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाचा भाग म्हणून ऐरोलीपासून बोगद्यापर्यंत दोन हजार ३९० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यासाठी १४५ कोटी रुपयांच्या कामाची निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. मेसर्स एम.सी.एम. कन्स्ट्रक्शन कंपनीस ७.२४ टक्के जादा दराची ही निविदा बहाल करण्यात आली असून यामध्ये बोगदा खणण्याच्या कामाचा मात्र समावेश नाही, अशी माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या नियोजित मार्गात पारसिक डोंगरातून बोगदा खणण्याचे काम सर्वाधिक आव्हानात्मक आणि खर्चीक असल्याने पहिल्या टप्प्याचा खर्च आणखी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढण्याची शक्यताही सूत्रांनी दिली.