ठाणे : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा या उद्देशातून ऐरोली-काटई मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा काही भाग शीळ, डावले, डोमखार आणि देसाई या गावातून जाणार असून त्याच्या भुसंपादनासाठी पालिकेच्या तिजोरीत पैसेच नसल्याने या मार्गाच्या उभारणीची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या मार्गाच्या भुसंपादनासाठी पालिका प्रशासन एक प्रस्ताव तयार करून त्याद्वारे भुसंपादनासाठी शासनाकडे ४०८ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. पालिकेवर साडे तीन हजार कोंटीचे दायित्व झाले होते. करोना काळानंतर उत्पन्न वसुली होऊ लागली असली तरी त्यातून मिळणारा महसूल दायित्वची रक्कम कमी करण्यावर खर्च होत आहे. तसेच पालिकेच्या आर्थिक परिस्थितीत अद्याप फारशी सुधारणा झालेली नसून यातूनच पालिकेक़डून निधीसाठी राज्य सरकारकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. अशाचप्रकारे पालिकेने आता ऐरोली-काटई मार्गाच्या भुसंपादनासाठी मागणी केली आहे.

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील प्रवाशांचा प्रवास वेगवान करण्याच्या दृष्टीने ऐरोली-काटई मार्ग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या १२ किलोमीटरच्या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावले, डोमखार आणि देसाई गावातून जाणार आहे. या जागेचे भुसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. या नियोजीत ४५ मीटर ते ६५ मीटर ऐरोली-कटाई मार्गापैकी ३० मीटर रुंदीकरिता भुसंपादनाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून या कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे सात महिन्यांपुर्वी केली होती. परंतु एमएमआरडीएने मात्र ३० ऐवजी विकास आराखड्यात दाखविल्याप्रमाणे ४५ मीटर रुंद रस्त्याचे भुसंपादन करण्याबाबत पालिकेला कळविले होते. यामुळे पालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली असून हा प्रस्ताव शासनाकडून पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे.