ठाणे : अजित पवार यांना सगळ माहित आहे की, लोक पक्ष सोडून का जातात आणि त्यांच्याबरोबर लोक का गेली, हेसुद्धा त्यांना आणि राज्यालाही माहित आहे. त्याविषयी मी बोलण्याची ताकद दाखवतो म्हणूनच त्यांना माझा राग येतो, असे विधान राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
अभिजीत पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. यानिमित्ताने राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. अभिजीत पवार याला मी आयुष्यात काय केले, हे सर्व माहित आहे. तो सावलीसारखा माझ्यासोबत असायचा. परंतु अजित पवार यांना विनंती आहे की, हे काय चालू आहे. एका छोट्या माणसाच्या पक्ष प्रवेशासाठी काय स्तरावर गेले आहेत आणि अजित पवार तुम्ही हे करू देता, असे आव्हाड म्हणाले. माझ्या संपत्तीची खुली चौकशी करा. ३५ वर्ष राजकारण करतोय. ९३ साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो. २००२ साली आमदार झालो. हे केवळ शरद पवार यांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतका घाणेरडा माणूस असतो तर त्यांनी मला जवळ ठेवले नसते, असेही ते म्हणाले. कमीतकमी कोणाचा तरी जीव जाईल एवढ तरी लक्षात घ्या. प्रत्येकजण गेंड्याच्या कातडीचा नसतो. अभिजीतची बायको जर त्याच्या मागे उभी राहिली नसती याने शंभर टक्के फाशी घेतली असती. अजित पवार हे काय चालू आहे. आम्ही का नाही तुमच्यावर बोलणार, चिडणार वर्षभर ठाण्यात हेच करतायेत, असेही आव्हाड म्हणाले.
माझी मुंब्र्यातली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस, खोटे फोन, महापालिका प्रशासन वापरले जात आहे. कोणालतरी अभिजीत याला मोक्का लावणार असे सांगितले. पण, त्यासाठी कायदा असतो. माणसंही घरी पाठवली जातात. मला त्या माणसाबद्दल काही बोलायचे नाही. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार आहे. आम्हाला निधी देणार नाही. आमची कोंडी करणार, आमच्या माणसांना घाबरवणार, हे असे प्रकार सुरू आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे कधीच करत नाही, यावर मला विश्वास आहे. अजीत पवार यांनाही याबाबत माहिती आहे की नाही, याविषयी मला माहीत नाही. पण, त्यांची खालची माणसे काय करतात, हे मी राज्यासमोर आणले आहे, असेही ते म्हणाले.