ठाणे : साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले असून ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाने (अजित पवार गट) सोमवारी धरणे आंदोलन करत भिडे यांचा निषेध केला. तसेच भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणीही केली. राज्यातील सत्तेत असतानाही अजित पवार गटाने आंदोलन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये खाद्य पदार्थांच्या हातगाड्या सुरू
ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली. साईबाबांना लाखो लोक दैवत मानतात पण, साईबाबा हे देव नाहीत, त्यांना देव्हाऱ्यात बसवू नका असे लोकांच्या भावनेचा अवमान करणारे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्माा गांधी यांच्यामुळे भारताची जगात ओळख आहे.
हेही वाचा >>> कल्याण मधील गौरीपाडा तलावातील शेकडो मासे मृत; प्रदुषित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचा अंदाज
महात्मा फुले यांनी मुली-स्त्रियांना शिक्षण देण्याचे मोलाचे काम केले. राजाराम मोहन राॅय यांनी सती प्रथा बंद केली, अशा महनीय व्यक्तिंविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी परांजपे यांनी यावेळी केली आहे. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. भिडे यांंना अटक करण्याची मागणी होत आहे. परंतु अटकेची कारवाई होत नसल्यामुळे राज्य सरकारवर टिका होत आहेत. असे असतानाच, राज्यातील सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाच्या ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.