ठाणे : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी असल्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले असून बुधवारी रात्री राष्ट्रवादी च्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमून घोषणाबाजी केली. तसेच महाआरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> ‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी..’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान; म्हणाले, “वेद, मानववंशसास्त्राचा अभ्यास…”
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शिर्डी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला. त्यावर आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री आव्हाड यांच्या नाद बंगला या निवासस्थानाबाहेर जमून घोषणाबाजी केली. तसेच कार्यकर्ते महाआरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेले. यानंतर अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.
या घटनेनंतर आव्हाड यांच्या बंगला परिसरात त्यांचे कार्यकर्ते जमले आहेत. तसेच पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे