लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांचे छायाचित्र वापरण्यावरून वाद रंगलेला असतानाच, ठाण्यात अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावरील फलकावरून शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्यादिवशीच म्हणजेच बुधवारी अचानकपणे बदल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महिन्यांपुर्वी फुट पडली. सत्तेत सामील होत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तर, त्यांचे सहकाही मंत्री झाले. यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. दोन्ही गटाने पक्षावर दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणुक आयोगापर्यंत पोहचला आहे. त्यावर आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार हे आमचे दैवतच असे अजित पवार गटाकडून सातत्याने सांगण्यात येत असून त्यांच्या गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र फलकावर लावले जात होते. त्यास शरद पवार यांनीच आक्षेप घेतला होता. शरद पवार यांनी छायाचित्र वापरू नका, अशा सुचना अजित पवार गटाला केल्या होत्या. तसेच छायाचित्र वापरल्यास न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र वापरले जात होते. अशाचप्रकारे ठाणे शहरात अजीत पवार गटाचे जिल्हा कार्यालय आहे.

आणखी वाचा-ठाण्यातील दुचाकीस्वाराकडून ३४ तासात साडे तीन शक्तिपीठांचा प्रवास

जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे दोन्ही नेते या कार्यालयातून जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज करतात. या पक्ष कार्यालयावर एक फलक लावण्यात आला होता. त्यामध्ये शरद पवार यांचे मोठे छायाचित्र होते. हे छायाचित्र बुधवारी अचानकपणे हटविण्यात आले आहे. त्या जागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शरद पवार यांचा १२ डिसेंबर म्हणजेच मंगळवारी वाढदिवस होता. या दिवशी त्यांचे छायाचित्र कार्यालयाच्या फलकावर होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी हे छायाचित्र हटविण्यात आले आहे. अचानकपणे झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी (अजीत पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Story img Loader