ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी अर्धवट माहिती देऊन त्यांच्या सोयीचा इतिहास सांगत असतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. सोमवारी नागालँडच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले आहे. आव्हाड यांनी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर टिका केली आहे.
नागालँड येथील विधानसभा निवडणुकीत ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ (एनडीपीपी) आणि भाजपा युतीचे ३७ आमदार निवडून आले होते. त्यामुळे एनडीपीपीचे नेते नेफ्यू रियो मुख्यमंत्री झाले. याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. त्यांनी रियो यांना समर्थन दिले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या सर्व आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले आहे. जर आमदारांचे समर्थन होते, तर शपथपत्र का घेतले नाही, असा मुद्दा उपस्थित करत आव्हाड यांनी आमदारांच्या भूमिकेला विरोध केला आहे.
हेही वाचा – कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक सुरळीत, मालगाडीच्या इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घतेली. आव्हाड हे नेहमी अर्धवट माहिती देतात. तसेच त्यांच्या सोयीचा इतिहास सांगत असतात, असा आरोप परांजपे यांनी केला. तसेच निवडणुकांपूर्वी एनडीपीपी आणि भाजपाची युती होती. दोन्ही पक्षांचे ३७ आमदार होते. ही संख्या सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी होती. तरीही ८ मार्चला राष्ट्रवादीच्या आमदारांनी तेथील नागालँडचे मुख्यमंत्री रियो यांना पाठिंबा दिला होता. आव्हाड यांनी टीका करताना वस्तुनिष्ठ आणि खरा इतिहास सांगावा असे परांजपे म्हणाले.