जेवणावळींचा खर्च कोटींवरून ३० लाखांवर; ठाण्यातील आमदाराच्या मदतीने खर्चात बचत
अखिल भारतीय नाटय़ संमेलनासाठी ठाणे शहरात येणारे नाटय़कर्मी, नाटय़ परिषदेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवरांच्या भोजन व्यवस्थेसाठी पंचपक्वानांचा बेत आखत शहरातील बडय़ा हॉटेल मालकाकडे जोडे झिजविणाऱ्या स्थानिक आयोजकांना सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक पाहून अक्षरश: घाम फुटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या महागडय़ा पंचतारांकित जेवणावळींमुळे संमेलनाचा खर्च तिप्पट वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने अखेर संयोजकांना ही मुक्त हस्ते उधळण रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. नामांकित पंचतारांकित हॉटेलमधील पंचपक्वान्नांच्या मेजवानीचा बेत रद्द करत हा खर्च कमी करण्यासाठी ठाणे शहरातील एका आमदाराला यासाठी साकडे घालण्यात आले. या आमदारानेही मग आपल्या मर्जीतील एका कॅटररकडे जेवणाची व्यवस्था सोपवत एक कोटीवर जाऊ पाहणारा जेवणावळींचा खर्च ३० लाखांपर्यंत आणल्याचे सांगितले जाते.
ठाणे नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी ठाणे शहरासह महाराष्ट्रातील विविध भागांमधून प्रत्येक दिवशी सुमारे सहा हजारांहून अधिक रसिक संमेलनस्थळी दाखल होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. यातील विशेष अतिथी, पाहुणे, पदाधिकारी, निमंत्रित रसिक आणि संयोजन समितीच्या सदस्यांसाठी आयोजकांमार्फत जेवणाची व्यवस्था केली जाते. शुक्रवारपासून भरणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने किमान चार ते पाच हजार जणांची जेवणाची व्यवस्था पाहावी लागेल, असा आयोजकांचा अंदाज आहे.
संमेलनाच्या आयोजनाची व्यवस्था ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी स्वत:कडे घेतली. त्यामुळे संमेलनाचा थाट तारांकित राखला जावा असा आग्रह काही नेत्यांनी धरला. त्यामुळे निमंत्रितांच्या जेवणाची व्यवस्था ठाण्यात ‘टिपटॉप’ समजल्या जाणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनाकडे सोपविण्याचेही ठरले. पंचपंक्वानांची यादी या व्यवस्थापनाकडे सादर करण्यात आली. त्यावर आयोजकांपुढे सुमारे एक कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक ठेवण्यात आले. हे अंदाजपत्रक पाहून आयोजकांनी पंचपक्वान्न जेवणावळींचा बेत आवरता घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संयोजकांनी हा खर्च कमी करण्यासाठी पंचतारांकित पक्वान्ने कमी करून नव्या भोजन व्यवस्थापकाकडे ही जबाबादारी देण्याचे निश्चित केले.

ठाण्यासारख्या शहरात नाटय़ संमेलन होत असल्याने सगळे काही टिपटॉप असावे ही अपेक्षा करणे गैर नाही. मात्र जमा-खर्चाचे गणित पाहूनच पाय पसरायला हवेत. आयोजकांनी जेवणासाठी तारांकित हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता हे वृत्त खरे आहे, परंतु पंचपक्वानांचा आग्रह धरणे योग्य नव्हते.
– आमदार, ठाणे शहर

नाटय़ संमेलनाच्या जेवणासाठी सुरुवातीला एक कोटीचा खर्च अपेक्षित होता. मात्र नाटय़ संमेलनाच्या जेवणावळीवरील खर्च नाटय़ संमेलनाचा खर्च वाढवत असल्याने तो कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार नव्या भोजन व्यवस्थापकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सुरुवातीला हा खर्च एक कोटीच्या आसपास होता, आता ३० लाखांत तो पूर्ण केला जाणार आहे. यापूर्वी कोणत्या हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता हे सांगता येणार नाही.
– विद्याधर ठाणेकर, प्रमुख कार्यवाहक