ठाण्यात संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. या महोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेस डावलण्यात आल्याचा आरोप संस्थेच्या ठाणे शाखेने केला आहे. मागील २६ वर्षांपासून नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या मदतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येत होता. परंतु नाट्यपरिषदेस डावलत महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सर्व संकेत, प्रथा, संबंधित ठरावांची पायमल्ली करत एकांगी निर्णय घेतले होते, असा आरोप संस्थेने केला आहे. त्यासंदर्भाचे पत्र संस्थेचे कार्याध्यक्ष नरेंद्र बेडेकर यांनी ठाणे महापालिकेस दिले आहे. विशेष म्हणजे नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी खासदार राजन विचारे हे आहेत. त्यामुळे गटा-तटातील कुरघोडीच्या राजकारणामुळे देखील डावलल्याची शक्यता संस्थेकडून व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ठाण्यामध्ये संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवास सुरुवात झाली होती. या महोत्सवाला ठाणे महानगरपालिकेने विशेष ठरावाद्वारे सहकार्य दिले होते. त्यामुळे मागील २६ वर्षांपासून ठाण्यात हा महोत्सव आयोजित केला जात होता. सध्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष हे खासदार राजन विचारे आहेत.
हेही वाचा: ठाणे : कल्याणमध्ये गाय-म्हशींच्या गोठ्यात चोरी करणारे दोन जण अटकेत
यंदा २ ते ४ डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या आयोजनावेळी संस्थेस डावलण्यात आल्याचा आरोप संस्थेने केला आहे. सातत्याने प्रयत्न करूनही पूर्वनियोजित तारखांना म्हणजेच चार ते सात नोव्हेंबर या कालावधित हा उत्सव आयोजित होऊ शकला नाही. पालिका अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यासंबंधित आयोजित बैठकाही ऐनवेळी रद्द केल्या गेल्या, असा आरोप संस्थेने केला आहे. त्यासंदर्भाचे पत्र संस्थेने महापालिकेस दिले आहे. तसेच महापालिकेतील काही अधिकारी गैरफायदा घेत सर्व संकेत, प्रथा, संबंधित ठराव यांची पायमल्ली करत एकांगी निर्णय घेतल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा: ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात अपंग महिलेचा लाखोंचा ऐवज चोरीला; दोन चोरांना अटक
शिंदे- ठाकरे गटाची किनार?
गेल्या पाच महिन्यांपूर्वी राज्यात जी राजकीय मोडतोड झाली आणि गटातटांच्या कुरघोडीचं राजकारण सुरू झालं, त्याची पार्श्वभूमी देखील याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे, असा आरोप संस्थेने केला आहे. सध्या ठाण्यात स्वातंत्र्यदिनी झेंडा कोणी लावायचा, तलावपाळीवर दिवाळीचा कार्यक्रम कोणी करायचा या गोष्टीही दुर्दैवाने न्यायालयापर्यंत जात आहेत. अशा दूषित वातावरणात संगीतादी कलाक्षेत्रामध्ये कुठलीही कोर्टबाजी नसावी आणि अन्यायकारकरीत्या संस्थेला डावलले असले, तरी दीर्घ परंपरा असलेल्या राम मराठे महोत्सवाला अपशकुन होऊ नये, हीच आमची समंजस भूमिका आहे. असेही पत्रात म्हटले आहे.