Akhilesh Shukla Police Custody : कल्याण येथील योगीधाम अजमेरा हाईट्स संकुलातील एका कुटुंबाने (शुक्ला) धूप अगरबत्ती लावली आणि त्या धुराचा त्रास होतो या कारणामुळे त्यांच्या शेजाऱ्यांशी भांडण झालं. या इमारतीतील अखिलेश शुक्लाच्या कुटुंबाने त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर वाद घातला. या वादाचं रुपांतर मोठ्या हाणामारीत झालं. शुक्लाने गुंडांची टोळी बोलावून शेजारी राहणाऱ्या देशमुख कुंटुंबाला मारहाण केली. यामध्ये दोन जण जबर जखमी झाले आहेत. शुक्ला व त्याच्या १० गुंडांनी मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. मराठी समुदायाचा उल्लेख करत शिवीगाळ केली. त्यानंतर देशमुख कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला देशमुख कुटुंबाची फिर्याद नोंदवण्यास टाळाटाळ केली. अखेर नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांनी शुक्लाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. तसेच त्याने बोलावलेल्या गुंडांच्या टोळीतील सहा जणांना ताब्यात घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पोलिसांनी आज शुक्ला व त्याच्या साथीदारांना न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर न्यायालयाने शुक्ला व त्याच्या साथीदारांची सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करून, शुक्लासह त्याच्या साथीदारांची चौकशी करून सहा दिवसांनी न्यायालयासमोर साक्षीपुरावे सादर करतील.

कल्याण मारहाण प्रकरणातील अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता व इतर चार आरोपींना कल्याण न्यायलयात उभे करण्यात आले होते. शुक्ला पती-पत्नींसह चार जणांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात जाणून-बुजून वाद निर्माण केला जात आहे, मराठी-हिंदी असा काही वाद नाही, असं आरोपीचे वकील अनिल पांडे म्हणाले. आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये अगरबत्ती लावण्यावरुन वाद झाले होते त्यानंतर मारहाण करण्यात आली. उर्वरीत आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे. या प्रकरणामुळे प्रांतवाद सुरु झाला आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे फिर्यादीचे वकील हरीश सरोदे म्हणाले.

हे ही वाचा >> “राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

आरोपीचे वकील काय म्हणाले?

आरोपीचे वकील अनिल पांडे म्हणाले, “अखिलेश शुक्ला यांना सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादींच्या बाजूने मराठी-अमराठी असे अनावश्यक मुद्दे मांडण्यात आले. हे दुर्दैवी आहे. असं काही घडलंच नाही. केवळ धूप-अगरबत्तीमुळे वाद झाला होता. हिंदी-मराठी असा वाद निर्माण केला जात आहे. पोलिसांनी आमच्या आशिलाविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस त्यांचीच बाजू घेत आहेत”.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh shukla and his gang members remanded 6 days police custody kalyan assault case asc