कल्याण – बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे आरोपपत्र न्यायालयासमोर दाखल होण्यापूर्वीच त्याला सरकार, सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगार म्हणून जाहीर केले. आरोपपत्रातील एकही कागदपत्र कोणीही वाचलेला नसताना, त्याची कोणतीही उलटतपासणी झाली नसताना, मधला मार्ग त्याच्यासाठी वापरण्यात आला आहे. एकंदर ही परिस्थिती पाहता हे सगळे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत आणि संशयास वाव देणारे आहे, असा आरोप मयत अक्षय शिंदेचे वकील ॲड. अमित कटारनवरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
अक्षयच्या दफनासाठी बदलापूर परिसरात जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी अक्षयचे नातेवाईक आणि अक्षयचे वकील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. यावेळी सरकार पक्षाने पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे बदलापूर पोलिसांनी अक्षयच्या नातेवाईकांना बदलापूर परिसरात दोन ते तीन जागा अक्षयच्या दफनासाठी दाखविण्याची तयारी केली आहे. दफनासाठी योग्य जागा मिळाली तर त्या जागेवर अक्षयचे दफन केले जाईल, असे ॲड. कटारनवरे यांनी सांगितले.
हेही वाचा – डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डेब्रिजचे,भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली
आरोपपत्र न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच सत्ताधारी, सरकारने अक्षयला गुन्हेगार म्हणून जाहीर केले. आरोपपत्र दाखल होण्याच्या दिवशी त्याला चकमकीत मारण्यात आले. आरोपपत्रातील एकही कागद कोणीही वाचलेला नसताना. अक्षयचा याप्रकरणातील सहभाग किती आहे हे सिद्ध होण्यापूर्वीच त्याला मारण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत आहे, असे मत ॲड. कटारनवरे यांनी व्यक्त केले.
आपला मुलगा गुन्हेगार असता तर त्याला दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असती तरी चालले असते, असे अक्षयच्या वडिलांचे मत आहे. अक्षयला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही जिवंत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे अक्षयच्या नातेवाईकांनी आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करतात, दोषारोपपत्र दाखल करतात, त्यांच्या कोठडीसाठी मागणी करतात. पण कायद्याने आरोपीला दिलेल्या सर्व हक्कांची पायमल्ली करून, अक्षयला त्याची बाजू मांडून न देता, त्याला उलट तपासणीचा असलेला अधिकार हिरावून घेऊन याप्रकरणातील सत्य उघडकीस येण्यास बाधा आणली आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणात संशयाचा वास आहे, असे मत ॲड. कटारनवरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – ऑनलाईन लग्नस्थळ नोंदणीतून डोंबिवली पलावातील महिलेची फसवणूक
बदलापूरचे प्रकरण घडल्यानंतर अक्षयच्या नातेवाईकांवर हल्ला झाला. यापूर्वीही त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे समानतेच्या अधिकाराचा विचार करता, किरीट सोमय्यांपेक्षा अधिकचे पोलीस संरक्षण अक्षयच्या कुटुंबीयांना मिळाले पाहिजे. अक्षयच्या नातेवाईकांनी आपल्याही संरक्षणाची मागणी केली आहे. कारण समाज माध्यमांवर आपल्या कुटुंबीयांविषयी वाईट मते नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याही जिवाची काळजी असल्याने त्यांनी ही मागणी केली असावी, असे मत ॲड. कटारनवरे यांनी व्यक्त केले.