Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असतानाही घटना घाडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. यानंतर अक्षय शिंदेच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
माझा मुलगा असं करुच शकत नाही
बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेंने पोलिसांकडून पिस्तुल हिसकावून गोळीबार केला याबाबत विचारलं असता अक्षय शिंदेची आई म्हणाली, माझा मुलगा असं करुच शकत नाही. माझ्या मुलाबद्दल काहीही बोलतील, तो असं करुच शकत नाही. कामावर गेले तर रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरत असे. अक्षय शिंदे रस्ता क्रॉस करताना गाड्या येतात त्यांनाही घाबरत होता. तो कसा काय गोळीबार करेल? असा प्रश्न अक्षय शिंदेच्या आईने विचारला आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला अक्षय शिंदेच्या आईने फोनवरुन प्रतिक्रिया दिली.
मृतदेह ताब्यात घेणार नाही
आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही. तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो. शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी आमची अक्षय याच्यासोबत तळोजा कारागृहात भेटही झाली होती. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असं अक्षयच्या पालकांनी म्हटलं आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. त्यानंतर २० ऑगस्टला या प्रकरणाच्या विरोधात बदलापूरमध्ये मोठा बंद पाहण्यास मिळाला. बदलापूर बंदमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. बदलापूरकरांनी ९ तास रेल्वे रोकोही केला होता. या घटनेनंतर अक्षय शिंदेला फाशी द्या ही मागणीही जोर धरु लागली होती. आता अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला आणलं जात होतं. तेव्हा एपीआय मोरे यांची बंदुक अक्षय शिंदेने खेचली आणि गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात लोडेड बंदुक होती त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी अक्षय शिंदेला गोळ्या लागल्या. अक्षय शिंदे ला आणि जखमी पोलिसांना रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. ही माहिती आता समोर आली आहे. पीटीआयने या बाबतचं वृत्त दिलं आहे.