अंबरनाथ: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध होतो आहे. गुरुवारी अक्षयचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर दफनविधीच्या परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. तर अंबरनाथ मनसेच्या वतीने शहरात दफनविधी करण्याला विरोध केला गेला.

बदलापूर शाळेतील मुलींच्या अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी अक्षयच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारही रखडले आहेत. गुरुवारी ठाणे शहरातील कळवा येथे अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यास विरोध करण्यात आला. त्यापूर्वी बदलापूर शहरात त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध झाला. त्यामुळे पालकांनी अंबरनाथ शहरात पश्चिम भागात असलेल्या हिंदू स्मशानभूमीची पाहणी केली.

हे ही वाचा…Devendra Fadnavis on Encounter: बदलापूर एन्काऊंटर प्रकरण: “गुन्हेगार बंदूक रोखत असेल तर पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत” देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य!

त्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेत दफन विधीच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी धाव घेतली. मात्र येथे अर्ज स्वीकारला गेला नाही. पालिकेत यावर निर्णय घेण्यासाठी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अक्षयच्या पालकांनी तेथून काढता पाय घेतला. अंबरनाथ शहर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ शहरात अक्षयच्या दफन विधीला विरोध केला आहे. बदलापूर शहरात दफनविधीसाठी जागा उपलब्ध नाही. तर अंबरनाथ शहरात काही मोजक्या समाजाच्या दफनविधी आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या येथे दफन विधी शक्य नसल्याची चर्चा आहे.