३१ डिसेंबर रोजी दर अर्ध्या तासाने नाकाबंदीच्या ठिकाणांत बदल

ठाणे : नववर्ष स्वागताच्या पार्टीवरून परतताना मद्यपी तपासणी सुरू असलेले मार्ग टाळून अन्य मार्गानी घर गाठू पाहणारे तळीराम चालक यंदा पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहेत. दर अर्ध्या तासाने मद्यपी तपासणीची ठिकाणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांत २५० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर येऊर आणि अन्य गर्दीच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

नववर्ष स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच शहरातील ५४ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांची पथके शहरातील रस्त्यांवर तैनात केली जाणार असून ही पथके मद्यपी वाहनचालकांची तपासणी करतील.

ठाणे ते बदलापूर शहरापर्यंत ठाणे वाहतूक शाखेचे २५० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. वाहतूक शाखेची १८ युनिटे असून प्रत्येक युनिटकडे दोन ते तीन श्वास विश्लेषक यंत्रे आहेत. त्याद्वारे वाहतूक पोलीस शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. पाटर्य़ाना जाण्यापूर्वी अनेकजण वाहतूक पोलिसांची पथके कोणत्या मार्गावर तैनात आहेत, याचा अंदाज घेतात आणि पाटर्य़ामध्ये मद्य रिचवून घरी परतताना तपासणी मार्ग वगळून अन्य मार्गानी जातात. अशा चकवा देऊ पाहणाऱ्या मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी यंदा अर्धा तासाच्या फरकाने पथके जागा बदलून मद्य तपासणी करणार आहेत, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. तसेच हॉटेलमधील ग्राहकांना घरी परतण्यासाठी वाहनचालक किंवा टॅक्सीची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना देण्यात येणार आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

बदलापूरमध्ये कडेकोट बंदोबस्त

’ बदलापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, फार्म हाऊस आणि शेती पर्यटन केंद्रे नववर्ष स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. बडय़ा हॉटेलांनी विविध पॅकेज जाहीर केली आहेत. संगीताच्या तालावर ठेका धरण्याची आणि मेजवानीची व्यवस्था करण्यात येणार आहे. बदलापूर, वांगणी आणि नेरळ भागातील फार्म हाऊस आणि शेती पर्यटन केंद्रांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मोठय़ा हॉटेलांमध्ये संगीत, नृत्यासह लहान मुले, महिलांसाठी खेळ, स्पर्धा, बक्षिसे, सेल्फी पॉइंट अशी व्यवस्था आहे. प्रति व्यक्ती आठशे ते एक हजार रुपयांपर्यंतची पॅकेजेस उपलब्ध आहेत. लहान मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती एबीज हॉटेलच्या व्यवस्थापनाने दिली.

’ नववर्ष स्वागतासाठी बदलापूर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बदलापूरच्या ग्रामीण भागातील फार्म हाऊस मालकांना कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्या संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. वांगणी आणि राहटोली येथे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. या काळात दोन पथके शहरात गस्त घालणार आहेत. तसेच मद्यपी चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.

Story img Loader