बदलापूर : कर्जत तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने नदीकिनारी भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. ३०० हून अधिक जणांना नदी पल्याडच्या बीएसयुपी गृहप्रकल्पात हलवण्यात आले होते. तर नदी किनारच्या शाळाही रिकाम्या करण्यात आले होते. येथे असलेल्या एका वृद्धाश्रमातून ज्येष्ठांना वरच्या मजल्यावर हलवण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास बदलापूर कर्जत राज्यमार्गावर पाणी साचण्यास सुरूवात झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी बुधवारी दुथडी भरून वाहत होती. बदलापूर शहरातून वाहणारी ही नदी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून प्रवास करत बदलापुरात येते. या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बदलापूर शहरात पूरपरिस्थिती उद्भवते. बुधवारी सकाळपासूनच नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. अंबरनाथ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कर्जत तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे दुपारी बाराच्या सुमारास नदीने १६.५० मीटरची इशारा पातळी ओलांडली होती. तर सायंकाळी पाचच्या सुमारास उल्हास नदी १७.५० मीटर या धोका पातळीवरून वाहत होती. त्यामुळे बदलापूर शहरातील नदीकिनारच्या सखल भागामध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. नदी पल्याड यादव नगर भागात राहणारे ३०० नागरिक आणि त्यांच्या गोठ्यातील म्हशींना शेजारच्या बीएसयुपी गृहप्रकल्पात हलवण्यात आले होते. पश्चिमेला असलेल्या एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारीच बाहेर काढून सुखरूप घरी पोहोचवण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाचे प्रमुख भागवन सोनोने यांनी दिली. तर शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्याची घोषणा दुपारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली. विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत संपर्कात राहण्याचेही आदेश देण्यात आले होते. रितु वर्ल्ड भागातील बंगल्यातील नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. तर नदीपल्याड एरंजाड गावाजवळील मोहन वाटर एज प्रकल्पातील शेतघरमालकांना आपापली वाहने मुख्य रस्त्यावर आणि साहित्य वरच्या मजल्यावर नेण्याचे आवाहन करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. पूरस्थितीचा अंदाज पाहता बदलापूरच्या नदी किनारी स्पीड बोट, रबर बोट, आवश्यक साधने आणि अग्नीशमन कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.
महामार्ग, राज्यमार्ग पाण्याखाली
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सायंकाळच्या सुमारास बदलापूर कर्जत राज्यमार्गावर पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. याच भागात दोन वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. दुसरीकडे बदलापूर टिटवाळा मार्गावर दापिवलीजवळचा पुल आणि रायतेजवळचा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरची वाहतूक दुपारी ठप्प झाली होती. कल्याण अहमदनगर महामार्गावर किशोर गावाजवळ मुरबाडी नदीच्या पाण्यामुळे महामार्ग दुपारी ठप्प झाला होता. माळशेज आणि अहमदनगरला जाणारी वाहतूक बंद होती. मोरोशी येथे लहान दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. कल्याण अहमदनगर रस्त्यावर कांबे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागला.