अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवसही तुडुंब गर्दीचा
ऐंशी-नव्वदीच्या दशकातील सुप्रसिद्ध गाण्यांपासून ते काल-परवापर्यंतच्या गाण्यांच्या सादरीकरणाने सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी अंबरनाथ ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हजारो रसिकांच्या उपस्थितीत उडत्या चालीवरच्या हिंदी गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. ज्येष्ठांनीही गाण्यांचा मनमुराद आनंद घेतला.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित आणि लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेल्या ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अलका याज्ञीक यांनी दुसऱ्या दिवशी हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्या दिवशी निलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने या महोत्सवाची उत्सुकता वाढली होती. दुसऱ्या दिवशी अलका याज्ञिक यांची गायकी ऐकण्यासाठी ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये सायंकाळपासूनच रसिकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी सहा वाजताच संपूर्ण प्रांगण रसिकांनी गजबजले होते. अलका याज्ञिक यांच्या पहिल्या गाण्यापासूनच तरुणांनी ठेका धरला. ऐंशी-नव्वदीच्या काळात हिंदी चित्रपटांत गाजलेली गाणी याज्ञिक यांनी सादर केली. या गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चेतन राणा यांनीही किशोर कुमार, आर. डी. बर्मन, मोहम्मद रफी यांची गाणी सादर केली.
‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है’, ‘पालखी में होके सवार चली रे’ पासून, ‘छम्मा छम्मा’ ते ‘कभी खुशी कभी गम’, ‘एक दोन तीन’, ‘बाजीगर’ ते आजच्या ‘अगर तुम साथ हो’ आणि ‘दिलबर दिलबर’ अशी एकापेक्षा एक गाणी याज्ञिक यांनी सादर करून रसिकांना ठेका धरण्यास भाग पाडले. जवळपास चार पिढय़ांची गाणी याज्ञिक यांनी सादर केली. सुरुवातीला एकल आणि नंतर द्वंद्व गिते सादर करण्यात आली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या हा कार्यक्रम ऐकण्यासाठी प्रांगणाबाहेरही मोठी गर्दी झाली होती. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, अरविंद वाळेकर आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
संगीतमय आरंभ
अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या चौथ्या पर्वाला शुक्रवारी दिमाखदार सोहळ्यात झाली. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित आणि लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेला हा आर्ट फेस्टिव्हल ३ मार्चपर्यंत चालणार आहे. यावेळी सतारवादक पद्मश्री निलाद्री कुमार आणि त्यांच्या फ्युजन बँडच्या सादरीकरण झाले. भारतीय शास्त्रीय संगीतातील रागापासून सुरुवात करत बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांपर्यंतच्या संगीताला या वेळी नीलाद्री कुमार यांनी हात घातला. निलाद्री कुमार यांनी तयार केलेल्या गिटार आणि सतार यांचा संयोग असलेल्या झतार या वाद्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली. झतारच्या छेडलेल्या तारांमधून निघणारे स्वर, त्याला विजय घाटे यांच्या तबल्याची मिळणारी साथ आणि पाश्चिमात्य ड्रमसेट आणि जेम्बे वाद्यची जोड यामुळे एक वेगळीच सांगीतिक पर्वणी अंबरनाथकरांना अनुभवता आली. प्रसिद्ध संगीतकार सुभेन चॅटर्जी, अल्ला रखा खान, तौफिक कुरेशी अशा संगीतकारांची पुढची पिढी निलाद्री कुमार यांना साथ देताना दिसली.