ठाणे – शहापूर तालुक्यात येणाऱ्या भातसा धरणक्षेत्रात गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासाच्या कालावधीत भातसा धरण क्षेत्रात १४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणे सध्या ९९.३८ टक्के इतके भरले आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ६५० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< कल्याण, डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली; टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली

हेही वाचा <<< बदलापूर : पंधरवड्यातच महिनाभराचा पाऊस ; सप्टेंबरची सरासरी ओलांडली, सलग दुसऱ्या वर्षात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यांतील धरणांच्या तसेच उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहापूर तसेच मुरबाड तालुक्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. याबरोबरच शहापूर तालुक्यात येणाऱ्या भातसा धरणात मागील चोवीस तासाच्या कालावधीत १४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. भातसा धरणाची एकूण पाणी साठवणूक क्षमता ही ९४२.१० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तर सध्या धरण ९९.३८ टक्के भरले असून ९३६.२३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर हा वाढत असल्याने धरणातील पाणी पातळीत नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणातून ६५० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु केला आहे. यासाठी धरणाचे पाचही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले आहे. तसेच धरणातून पाणी सोडताना शहापूर तालुक्यातील अनेक भागांना जोडणारा सापगाव पूल पाण्याखाली जाऊ नये याकरिता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्ग वाढविणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All gates bhatsa dam opened release 650 cusecs water dam started ysh