ठाणे – अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा नवी मुंबईतील वाशी उपनगरात आयोजित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी या दोन संस्थांच्या पुढाकाराने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत वाशी येथील साहित्य मंदिर येथे पार पडणार आहे. पुण्याच्या प्राज उद्योगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत.
मराठी विज्ञान परिषदेच्या महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर ६५ संलग्न विभाग आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन होत असते. यंदा या अधिवेशनाचे ५८ वे वर्षे आहे. मागील वर्षी गोवा राज्यात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. हे अधिवेशन मुंबईत पहिल्यांदाच होत आहे. यानिमीत्ताने नवी मुंबईकरांचे काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती विभाग कार्यवाह अजय दिवेकर यांनी दिली. शनिवार, ९ डिसेंबर रोजी ९.३० वाजता नवी मुंबईचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पुण्याच्या प्राज उद्योगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे अधिवेशनाध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषदेचे मध्यवर्ती अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा – टिटवाळ्यात रिक्षाचालकाने केली पत्नीची हत्या
जीवन गौरव, व्याख्यानाची मेजवानी
या उद्घाटना दिवशी मराठी विज्ञान परिषद जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, सन्मानकऱ्यांचा गौरव, स्मरणिका प्रकाशन, ई – पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. दुपारच्या सत्रात प्रसिद्धी खगोल शास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळच्या सत्रात उद्योग आणि पर्यावरण या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. या परिसंवादात ठाणे-बेलापूर इंडस्ट्री असोसिएशनचे महाव्यवस्थापक एम.एम.ब्रह्मे, तुर्भे येथील कॉमन एफ्लुयंट ट्रिटमेंट प्लॅंटचे संचालक डॉ. एम.पी.देशपांडे, नवी मुंबई येथील रिलायन्स उद्योगचे डॉ. विजय हब्बू आणि एमएमआरडीएचे माजी प्रमुख केदारनाथ घोरपडे हे सहभागी असणार आहे. तर, कांदळवन जैवविविधता आणि जैवविविधता केंद्र या विषयावर मॅनग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर, प्रा. सुधीर पानसे यांचे विज्ञान कविता सादरीकरण होणार आहे.
डाॅ. बडवे यांचे व्याख्यान
या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात डॉ. राजेंद्र बडवे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर, घनकचरा व्यवस्थापन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात डॉ. शरद काळे, डॉ. एस. एल. पाटील, स्त्री मुक्ती संघटनेच्या वृषाली मगदूम आणि नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात विंचवाच्या विषावरील लस या विषयावर डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच महात्मा फुले रिन्युएव्हल एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे बिपिन श्रीमाळी यांचे उद्योग आणि ऊर्जा – समस्या आणि उपाय या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी विज्ञान विषयावर एकांकिका पार पडणार आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागरी जैवविविधता केंद्र, फ्लेमिंगो दर्शन आणि निसर्ग उद्यानाला भेट दिली जाणार आहे. या सहलीसाठी आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे आयोजकांनी सांगितले.
हेही वाचा – ठाण्यात हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न; महापालिकेचा कर्मचारी ताब्यात
जीवनगौरव पुरस्कार
डॉ. राजेंद्र बडवे हे मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक आहेत. त्यांना शल्यक्रियातज्ञ आणि कर्करोगतज्ञ म्हणून २८ वर्षांचा अनुभव आहे. टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगासाठी उत्तम काम करणारी संस्था म्हणून जगात असलेले नाव मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्तनांचा कर्करोग, कर्करोगातील नाविण्यपूर्ण संशोधन, कर्करोग निदानाचा आणि रुग्ण व्यवस्थापनाचा दर्जा, कर्मचाऱ्यांच्या कामाची वाढती क्षमता या क्षेत्रात राजेंद्र बडवे यांनी प्राविण्य मिळविले आहे. तर, खगोलशास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांनी खगोल भौतिकशास्त्रज्ञाचा अभ्यास युके येथील चर्चिल कॉलेज ऑफ कॅब्रिज येथून पूर्ण केले. त्यांनी खगोलशास्त्रात आकाशगंगा आणि वैश्विक साखळीत ब्लॅक होल्सवरती काम केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये (एआय) त्यांनी अल्गोरीदममध्ये काम केले आहे. या अधिवेशनात डॉ. राजेंद्र बडवे आणि खगोलशास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ते दोघेही आपापल्या क्षेत्राबद्दल उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.