डोंबिवली – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उभरते नेतृत्व, शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांना पर्यटनासाठी बाहेर गेलेले असताना पाच दिवसापूर्वी साप चावला. धाडसी स्वभावाच्या महेश पाटील यांनी साप चावल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न लावता स्वताहून घटनास्थळीच सापाला पकडले. ते स्वता तातडीने सापाला घेऊनच रूग्णालयात येऊन दाखल झाले. आता त्यांची तब्येत ठीक आहे. आपण जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने ठीक आहोत, असा संदेश तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी समाज माध्यमावर प्रसारित केला आहे.

महेश पाटील यांना साप चावल्याची माहिती मिळताच, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व पक्षीय नेत्यांनी महेश पाटील यांची डोंबिवली एमआयडीसीतील एका खासगी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. महेश पाटील पाच दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यात एका पर्यटनस्थळी पर्यटनासाठी गेले होते. तेथे त्यांना साप चावला. साप चावल्यानंतर धाडसी स्वभावाच्या महेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता चपळाईने सापाची मान पकडून त्याला जखडून ठेवले. सापाला घेऊनचे ते तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

हेही वाचा >>> तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

डाॅक्टरांना साप विषारी कि बिनविषारी आहे हे तातडीने समजल्यावर डाॅक्टरांनी त्या गतीने महेश यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारी डाॅक्टरांनी महेश यांना साप चावल्याची माहिती लोकसत्ताला दिली. ते आता सुखरूप असल्याचे ते म्हणाले. चावल्यानंतर त्वचेवर दोन दात दिसले तर तो विषारी साप आणि दोनहून अधिक दातांचे व्रण असले की तो बिनविषारी साप मानले जाते.

नेत्यांची धावाधाव

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी तालुकाप्रमुख महेश पाटील इच्छुक होते. तशी तयारी त्यांनी केली होती. त्यांच्या ऐवजी शहरप्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी मिळाली. महेश पाटील कल्याण ग्रामीणमधील वजनदार राजकीय नेतृत्व ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात येत असताना महेश पाटील यांना साप चावल्याने महेश यांचा आपणास पाठिंबा मिळेल या विचारात असलेल्या कल्याण ग्रामीणमधील शिवसेना सोडून इतर पक्षातील नेत्यांची धावपळ उडाली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा; फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी

महेश यांची विचारपूस करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीतील भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारी सुभाष भोईर, मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह खासगी रुग्णालयात जाऊन महेश पाटील यांच्या तब्येची विचारपूस केली. त्यांना लवकर बरे करण्यासाठी डाॅक्टरांना सूचना केल्या. महेश पाटील यांनी समर्थकांच्या माहितीसाठी आपण एकदम ठीक असल्याचे समाज माध्यमातून कळविले आहे. महेश पाटील यांना काही दिवस आराम करावा लागणार असल्याने शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांचा प्रचार करण्यात ते किती सहभागी होतात याविषयी सांशकता व्यक्त केली जात आहे. महेश पाटील निष्ठावान शिवसैनिक असले तरी त्यांचे भाजप, ठाकरे गट, मनसे आणि इतर राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध आहेत.

Story img Loader