ठाणे स्थानकातील प्रवाशांची वाट सुकर

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात घडलेल्या दुर्घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकातील प्रवाशांची वाट सुकर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या प्रस्तावानुसार ठाणे स्थानकात सध्या असलेले सर्व पादचारी पूल एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातील एकूण चार पादचारी पूल आहेत. त्यातील मुंबई आणि कल्याणच्या दिशेने असलेले दोन पादचारी पूल हे अरुंद आणि जुने झाले आहेत. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या गर्दीच्या वेळेत येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. अनेकदा बाहेर गावी जाणाऱ्या एक्स्प्रेस, नवी मुंबईहून आणि सीएसटीहून ठाण्याला येणाऱ्या लोकल एकाच वेळेत ठाणे रेल्वे स्थानकात आल्यास संपूर्ण स्थानकात गर्दी होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील हे पादचारी पूल एकमेकांना जोडण्यात येण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी मांडला आहे. हे पादचारी पूल एकमेकांना जोडल्यास रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर होणारी गर्दी सहज टाळता येऊ शकते. अशाप्रकारचा प्रयोग पश्चिम रेल्वेने बोरिवली या रेल्वे स्थानकात केला आहे. त्यामुळे येथील पूल मोकळे झाले आहेत. येथील पूल एकमेकांना जोडल्यास येथेही गर्दी विखुरण्यास शक्य होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोपर रेल्वे स्थानकाचाही कायापालट

प्रशासनाने कोपर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने ‘कोपऱ्या’त असलेल्या या रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलण्याची शक्यता आहे. या रेल्वे स्थानकात वसई, डहाणूहून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांतून दिवसाला सुमारे ४० हजार प्रवासी कोपरच्या दिशेने येतात. तसेच कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ३० हजार इतकी आहे. त्यामुळे उन्नत रेल्वे स्थानकात आणि मध्य रेल्वेच्या स्थानकात गाडय़ा एकाच वेळी आल्यावर कोंडी होते. येथील तिकीट घरही पादचारी पुलावर असल्याने आणि वसईच्या दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांनाही येथूनच प्रवेश असल्याने तिकीट काढणाऱ्या आणि इतर प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटना घडतात.  या पाश्र्वभूमीवर कोपर रेल्वे स्थानकातील उन्नत आणि मुख्य रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावरील तिकीटघर एका बाजूला हलविण्यात येईल. तसेच पादचारी पुलाची आठ फूट असलेली रुंदी दुप्पट म्हणजेच १६ फूट करण्यात येईल. तसेच कल्याणच्या दिशेने असलेल्या रुंदीही वाढविण्यात येणार आहे. या दोन्ही गोष्टी शक्य न झाल्यास पश्चिमेच्या दिशेने ‘होम प्लॅटफॉर्म’ तयार करून त्याला लागून जिना तयार करण्यात येईल.

Story img Loader