ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे शिवसेनेचे सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याची चर्चा रंगली आहे. आज (शनिवार) ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे, पंचायत समितीचे बाळाराम कांबरी यांच्यासह इतर सदस्य आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सर्वच माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे बदलापुरात शिवसेना रिकामी झाली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या बहुतांश नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सुरुवातीला मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती. शनिवारी मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि स्विकृत नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर एका माजी नगरसेवकाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे शहरातील माजी नगरसेवकांची संख्या २५ वरून २३ वर आली होती. त्यातच शिवसेनेचे माजी गट नेते श्रीधर पाटील यावेळी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले. मात्र गटनेते श्रीधर पाटील यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे. माजी नगरसेविका नेहा आपटे हे दोन नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हते. मात्र काही खासगी कारणांमुळे शहराबाहेर असल्याने ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे बदलापूर आतील सर्वच माजी नगरसेवक शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.

बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही –

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पुष्पा पाटील, अंबरनाथ पंचायत समितीचे बाळाराम कांबरी त्यांचे इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेत असलेल्या सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. बदलापूर शहर ठाणे जिल्ह्यातील सर्वांनीच पाठिंबा देणारे एकमेव शहर ठरले आहे.