ठाणे : पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी शहरातील सखल भागांचा पाहाणी दौरा करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. या भागांमध्ये साचणारे पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्यात यावे आणि त्याचबरोबर रस्त्यावरील पावसाळी गटाराची झाकणे उघडून वाहून कचरा साफ करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. त्यातच येत्या २९ आणि ३० जून रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहराचा पाहाणी दौरा करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ठाणे शहरातील वंदना एस.टी. डेपो परिसर, जांभळीनाका येथील पेढ्या मारुती परिसर, भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे रेल्वेस्थानक परिसर या ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. पावसाचे पाणी साचून वंदना एस.टी. डेपो परिसर जलमय होतो. या ठिकाणी पंपाच्या साहाय्याने साचललेल्या पाण्याचा उपसा करण्यात येतो. हे पाणी एस.टी डेपोच्या बाजूच्या नाल्यात न सोडता रस्ता ओलांडून नाल्याच्या पुढील भागामध्ये सोडणे शक्य असेल तर तशी कार्यवाही करावी. अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणी महापालिका कर्मचारी तैनात ठेवण्यात यावेत. वंदना एस.टी. डेपो परिसरापासून ते गजानन महाराज मठापर्यंत असलेल्या सर्व पावसाळी गटारांवरील जाळ्या काढून वाहून आलेला कचरा दैनंदिन साफ करावा, असे निर्देश त्यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले. या ठिकाणचे कलव्हर्ट वाढवून किंवा होल्डिंग पाँडच्या माध्यमातून पाण्याचा निचरा होऊ शकेल का याची शक्यता पडताळून पहावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातर्फे आषाढीनिमित्त स्वच्छता, पर्यावरण दिंडी
चिखलवाडी, भांजेवाडी या परिसरात असलेल्या तबेल्यांमध्ये निर्माण होणारा कचरा किंवा इतर टाकावू गोष्टी घेवून जाण्यासाठी स्थानिक स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित गाडीची खेप उपलब्ध करून द्यावी. त्यांनतरही तबेले धारकांनी नाल्यामध्ये कचरा टाकला तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करावी, अशी ताकीद त्यांनी संबंधितांना दिली. चिखलवाडी परिसरातील पंपाद्वारे काढण्यात येणारे पाणी नवीन कोपरी पुलाच्या बाजूच्या पावसाळी गटारामध्ये सोडण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोर चिखलवाडी आणि मेंटल हॉस्पिटलकडून येणारे दोन नाले एकत्र येतात. हे दोन्ही नाले ज्या ठिकाणी मिळतात, त्या ठिकाणी वक्राकार पद्धतीने तात्पुरती भिंत बांधावी. जेणेकरून चिखलवाडी भागातून येणारे नाल्याचे पाणीही निचरा होवू शकेल, अशी सूचनाही त्यांनी केली. ठाणे रेल्वे स्थानकातील एक क्रमांकाच्या फलाकाजवळील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील पाणी परिसरात येऊ नये, याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
हेही वाचा – ठाण्याच्या खाडीवर जलपर्णीचा गालीचा, पावसामुळे उल्हासनदीतील जलपर्णी वाहून आली खाडीपात्रात
नागरिकांशी संवाद
जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसरातील पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी या ठिकाणी खोल खड्डा करून पंपाच्या सहाय्याने पाणी नाल्याच्या खालच्या भागात सोडण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना आयुक्त बांगर यांनी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तलावपाळीचे पाणी ओसंडून वाहू लागल्यानंतर पेढया मंदिराच्या बाजूच्या नाल्यामध्ये जाते. ते पाणी दुसऱ्या बाजूच्या नाल्यात सोडले तर त्या परिसरातील पाणी साचण्यावर मार्ग निघू शकेल, तसेच त्या संपूर्ण परिसरातील पावसाळी गटारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला निदर्शनास आला. तो गाळ काढण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले.