एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याला जागेचे वाटप
डोंबिवली : डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्त्यावर फेरीवाल्यांनी आता एकमेकांना भाडय़ाने जागा देण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्यावरील तीन बाय चार फूट जागेसाठी एक फेरीवाला दुसऱ्या फेरीवाल्याला दररोज पाचशे रुपयांचे भाडे देत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महापालिकेच्या पथकाने ती जागा मोकळी करून त्या ठिकाणी पालिकेचे वाहन उभे करण्यात आले आहे.
फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकापुढील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून एक मसाले विक्रेता व्यवसाय करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या जागेवर एका पाणीपुरी विक्रेत्याने बस्तान मांडले आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री होऊ लागल्याने ग्राहकांची गर्दी होऊ लागली असून त्यामुळे चौकातील वाहतुकीलाही अडथळा होऊ लागला आहे.
परिसरातील रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक यांनी या फेरीवाल्यास अटकाव केला. परंतु, त्यानंतरही या फेरीवाल्याने व्यवसाय सुरूच ठेवला. फेरीवाल्याने आधीच्या फेरीवाल्याकडून पाचशे रुपये रोज या भाडेतत्त्वावर ही जागा मिळवल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यांनी ‘फ’ प्रभागाचे अधिकारी अरुण भालेराव यांना माहिती दिल्यानंतर फेरीवाला पथकाने या जागेवर फेरीवाला हटाव पथकाची गाडी आणून उभी करण्यास सुरुवात केली आहे.
फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. ‘रहिवाशांना असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना संपर्क करावा,’ असे आवाहन नगरसेवक संदीप पुराणिक यांनी केले आहे.