कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेला रस्ते कामासाठी स्वत:ची घरे तोडून जमीन देणाऱ्या ३५८ पैकी २८७ रस्ते बाधितांना घरे, व्यापारी गाळे देण्याचा कार्यक्रम बुधवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पाडला. उर्वरित पात्र लाभार्थींना लवकरच घरांचा ताबा आणि चाव्या देण्याचा कार्यक्रम केला जाईल, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
मागील वीस वर्षांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागात पालिकेने रस्ता रुंदीकरणाची कामे करताना रस्त्याला अडथळा ठरणारी बाधितांची घरे, दुकाने तोडली. या बाधितांना भरपाई देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. बाधितांना भरपाई देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात वेळोवेळी महासभेमधील चर्चेच्यावेळी अडथळे आणि त्रृटी उपस्थित केल्या जात होत्या. या गोंधळात रस्ते कामासाठी जमीन देणारा बाधित पालिकेत मागील वीस वर्षे हेलपाटे मारून मेटाकुटीला आला होता. बाधितांना घरे देण्याचे समग्र धोरण अंतीम करण्यात आल्यानंतर बाधितांना घरे, व्यापारी गाळे देण्याचा निर्णय आयुक्त डाॅ. दांगडे यांनी घेतला.
हेही वाचा – पूर्व द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
घरे वाटप बाधितांमध्ये २८७ सदनिकाधारक, ७१ जण दुकाने, गाळे धारक आहेत. कल्याण पश्चिम, मांडा टिटवाळा येथील बाधितांना उंबर्डे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे वाटप करण्यात आली. या प्रकल्पात २५५ सदनिका आहेत. येथील चार इमारतींमधील २०४ सदनिका वाटप करण्यात आल्या. या प्रकल्पातील तळ आणि पहिल्या माळ्यावरील ४८ सदनिका दिव्यांग, वृद्धांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. पाचव्या माळ्यावरील सदनिका संक्रमण क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आल्या. कल्याण पूर्व, डोंबिवलीतील रस्ते बाधितांना पाथर्ली नाका इंदिरानगर झोपु योजनेतील इमारत क्रमांक १० व ११ मध्ये ८० सदनिकांचे वाटप करण्यात आले. या प्रकल्पात २२ सदनिका दिव्यांग, वृद्धांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बाधित यादी
पत्रीपूल-दुर्गाडी रस्ते बांधितांमध्ये १०२ जण लाभार्थी, इतर विकास कामांमध्ये बाधित झालेले आणि कचोरे येथील झोपु योजनेत पात्र ठरविण्यात आलेले लाभार्थी २८, कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते अनंत रिजन्सी ठाणगेवाडी चौक काळी मस्जिद रस्ते बाधितांमध्ये १७ जण लाभार्थी, शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक बाधितांमध्ये १४ जण, मुरबाड वळण रस्ता ते आरटीओ, सह्याद्रीनगर रस्ता बांधितांमध्ये १७ जण, पल्स रुग्णालय चिकणघर रस्ता रुंदीकरण चार जण, आधारवाडी ते मुरबाड वळण रस्ता १७ लाभार्थी, चक्कीनाका ते मलंग रोड ३६ जण, टिटवाळा रस्ते बाधितांमध्ये सात जण, उंबर्डे बाह्यवळण रस्ता चार जण लाभार्थी आहेत. डोंबिवली पूर्व दत्तनगरमधील झोपु योजनेत अपात्र ठरलेल्या ९० लाभार्थींना समूह विकास योजनेचा लाभ मिळेपर्यंत त्यांना इंदिरानगर येथील प्रकल्पात तात्पुरती घरे देण्याचा निर्णय राजकीय रेट्यामुळे प्रशासनाला घ्यावा लागला आहे.
“प्रकल्प बाधितांची पात्रता निश्चित करून शासन आदेशाप्रमाणे घर वाटप करण्याचा निर्णय घेतला. एकूण ३७८ लाभार्थी या योजनेत पात्र आहेत. उर्वरित लाभार्थींची कागदपत्र पडताळणी करून त्यांना घर, दुकानांचा ताबा देण्यात येईल. येत्या आठवडाभरात या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील.” असे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे म्हणाले.