ठाणे – मुंबई प्रवेशद्वारावरील टोल नाक्यावर एमएच ०४ वाहन क्रमांक असलेल्या वाहनांना टोलमुक्ती द्या अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन (टीसा) या उद्योजकांच्या संघटनेने केली आहे. या संदर्भाचे पत्र संघटनेच्या अध्यक्षा सुजाता सोपरकर यांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
मुंबईत बांधण्यात आलेल्या ५५ पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी टोलनाके सुरू झाले होते. परंतु टोल वसुलीची मुदत संपूनदेखील टोल वसुली करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना टोल वसुली कमी झालेली नाही. उलट टोलच्या रकमेत वाढ झाली आहे. पुलाचा वापर ठाणेकर करत नसतानाही त्यांच्याकडून टोलसक्ती अन्यायकारक आहे. त्यामुळे निदान ठाणेकरांची टोलवसुलीमधून सुटका करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – डॉक्टरांनी दिलेल्या श्रवणशक्तीच्या जोरावर डॉक्टर
ठाणेकरांना टोलमुक्त करू असे आपण जाहीरनाम्यात म्हणाला होता. आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने ठाण्याला बहुमान मिळाला आहे. त्यामुळे एमएच ०४ वाहन क्रमांक पाटी असलेल्या वाहनांना टोलमुक्ती द्यावी, असे आवाहनही पत्राच्या शेवटी करण्यात आले आहे.