ठाणे – शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्याही अडथळ्यांविना थेट ग्राहकाला विकता यावा यासाठी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विकेल ते पिकेल या अंतर्गत रयत बाजार अभियान राबविण्यात येत आहे. यांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी शेतकरी आठवडी बाजार भरविण्यात येत होते. यातून शेकडो टन भाजीपाल्याची विक्री होत असे. मात्र गेल्या वर्षभराच्या कालावधीत यातील सर्वच बाजार बंद झाले असून, केवळ नवी मुंबई येथे काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून बाजार भरविण्यात येत आहे. या आठवडी बाजाराची नागरिकांना मिळणारी अपुरी माहिती, शेतकऱ्यांना वेळोवेळी करावी लागणारी कागदोपत्री प्रक्रिया यामुळे हे बाजार हळूहळू बंद होत असल्याचे मत शेतकरी गटांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

शेतमाल विपणन व्यवस्थेतील दलाल आणि व्यापाऱ्यांची साखळी स्थानिक शेतकऱ्यांकडून अगदी कमी दरात शेतमाल खरेदी करून ग्राहकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विक्री करते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे. सर्व प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्याचे उत्तम अर्थार्जण व्हावे आणि शहरातील नागरिकांना उच्च दर्जाचा भाजीपाला मिळावा या हेतूने शहरात कृषी विभागाकडून निश्चित करून देण्यात आलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आठवडी बाजार करण्यात येत होता. विविध प्रकारचा आणि भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांकडूनही याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शहरातील मुख्य बाजारपेठ, गृह संकुलांचे आवर, वर्दळीचे रस्ते, महामार्ग, घाट या ठिकाणी विक्री केली जात होती. या उपक्रमात कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर भिवंडी येथील सुमारे २०६ शेतकरी गट जोडले गेले होते. तर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ठिकाणी या पद्धतीने भाजीपाल्याची विक्री केली जात असे. मागील वर्षभराच्या कालावधीत यातील जवळपास सर्वच विक्री स्थळ बंद झाले असून केवळ नवी मुंबई येथे पाच ते सहा ठिकाणी या पद्धतीने शेतकरी आठवडी बाजार भरविण्यात येत आहे. त्यालाही कमी प्रतिसाद असल्याची माहिती शेतकरी गटांकडून दिली गेली आहे.

हेही वाचा – विद्यादान सहाय्यक मंडळाचे भाऊ नानिवडेकर यांचे निधन

शेतकऱ्यांकडून भरावीला जाणाऱ्या आठवडी बाजाराची माहिती नागरिकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचायला हवी. शहरातील कोणत्या ठिकाणी हे बाजार भरतात याची जाहिरात व्हायला हवी. जेणेकरून नागरिक त्या ठिकाणी खरेदीसाठी येऊ शकतात. मात्र मागील वर्षभराच्या कालावधीत याचे प्रमाण फार अल्प होते. तसेच अनेक वेळी स्टॉल लावताना शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे. सर्व प्रक्रियेला कंटाळूनही काही शेतकऱ्यांनी या बाजारात भाजीपाला विक्री बंद केली. सध्या कृषी विभागाकडून मदत केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया एका शेतकरी गटाच्या अध्यक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रा येथे धर्मांतर झालं की नाही? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

या आठवडी बाजारात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी व्हावे यासाठी त्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडूनही शहरातील विविध ठिकाणी जागांची निश्चिती करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पुढाकार घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी यायला हवे. यातून शेतकऱ्यांचे चांगले अर्थार्जन होते आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचा शेतमाल मिळतो, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी दिली.