शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे आणि कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमुळे यंदा जिल्ह्यात आंबा लागवडीच्या नियोजनाहून अधिकचे उद्दिष्ट गाठले आहे. या फळलागवडीबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी आता फुलशेतीकडे देखील वळला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा १५.५७ हेक्टर वर मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये अधिकची लागवड ही मोगऱ्याच्या फुलांची झाली असून यात शहापूर तालुक्यात सार्वधिक लागवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हे पारंपारिक शेतीबरोबरच आता अधिकचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळले असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> गणपती विसर्जन आपल्या दारी उपक्रम ; गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली कर्मचारी येणार घरी
ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतीत विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. यामध्ये भातशेती बरोबरच शेतकरीवर्ग आता फळ आणि फुल शेतीकडे वळु लागला आहे. यावर्षी कृषी विभागातर्फे ठाणे जिल्ह्यासाठी ८१८ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. यंदा हंगामात ठाणे जिल्ह्यातील आंब्याला बाजारपेठेत उत्तम मागणी होती. यामुळे मागील वर्षी आंब्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे उत्तम अर्थार्जन देखील झाले. यासर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाला उत्तम प्रतिसाद दर्शवित जिल्ह्यात यंदा ९२१.२६ हेक्टरवर आंबा रोपांची लागवड केली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी आता फुलशेतीकडे वळला असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून मोगऱ्याच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षी कृषी विभागाकडून सुमारे ८ हेक्टरवर मोगऱ्याच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांकडून फुलशेतीला देखील उत्तम प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी सुमारे १४ हेक्टरवर मोगऱ्याची लागवड करण्यात कृषी विभागाला यश आले आहे. तर सोनचाफ्याची देखील शेतकऱ्यांकडून चांगली लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मोगऱ्याच्या रोपांची लागवड ही शहापूर तालुक्यात करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात यावर्षी १०.२० हेक्टरवर मोगऱ्याची लागवड करण्यात आली आहे. तर भिवंडीमध्ये ३.३७ हेक्टरवर क्षेत्रावर मोगऱ्याची लागवड करण्यात आली आहे. तर शहापूर तालुक्यात सुमारे ४ एकरवर सोनचाफ्याची लागवड करण्यात आली आहे. आर्थिक उत्पन्न अधिकचे मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी फळलागवडीबरोबरच फुलशेतीकडे देखील वळला असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> ठाणे शहरातील तापमानाचा पारा वाढला…. ; वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अगांची काहीली
मोगऱ्याला प्राधान्य का ?
मोगऱ्याचे कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न मिळते. तर रोपांना लागवडीकरिता पाणी कमी लागते. तसेच एकदा लागवड केल्यानंतर रोपांची नीट काळजी घेतल्यास वर्षभर त्यातून फुलांचे उत्पादन घेता येते. तसेच रोपांची लागवड करण्यासाठी जमीन मशागतीचा वारंवार खर्च करायची वेळ येत नाही. त्यामुळे ही शेती किफायतशीर ठरते. तसेच मोगरा फुलांची मागणीही बारमाही असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील चांगला मिळतो.
बाजारपेठ जवळ
जिल्ह्यातील फुलांची मोठी बाजारपेठ म्हणून कल्याण फुलबाजार ओळखला जातो. या बाजारात राज्यभरातील शेतकरी त्यांची फुले विक्रीसाठी आणतात. या बाजारपेठेचा चांगला फायदा हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांना वाहतूक खर्च देखील कमी लागत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या या फुलविक्रीसाठी ही बाजारपेठ सोयीची ठरते.
पारंपारिक शेतीबरोबरच शेतकरी सध्या आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या फुल आणि फळ शेतीकडे वळले आहेत. यावर्षी जिल्ह्यात फळ लागवडीबरोबरच फुल लागवड देखील उत्तम झाली आहे.- दीपक कुठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे