कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्त्यावर निळजे रेल्वे उड्डाण पूल येथे समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग विभागातर्फे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम शुक्रवारी (ता. ६) रात्री १२ वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम सोमवारी (ता.१०) रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरून पलावा जंक्शनकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वाहतूक विभागातर्फे रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीवरून बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
या बंदच्या काळात शिळफाटा रस्त्यावरून धावणाऱ्या हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जड, अवजड वाहनांचे चार ठिकाणचे प्रवेश बंद करून त्यांना पर्यायी वळण रस्ते मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने सुचविलेल्या सूचनेप्रमाणे वाहन चालकांनी पाच दिवस वाहतूक करावी, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक सांडभोर यांनी केले आहे.
शिळफाटा रस्त्यावर काटई ते खिडकाळी दरम्यान अगोदरच अरूंद रस्ता, दोन्ही बाजुच्या रस्ते सीमारेषांची कामे शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला न मिळाल्याने रखडली आहेत. या रस्त्यावर मेट्रो उभारणीची कामे सुरू आहेत. शिळफाटा रस्ता सतत वाहतूक कोंडीत अडकलेला असतो. आता येणारे पाच दिवस निळजे रेल्वे उड्डाण पूल पुनर्बांधणीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याचा विचार करून वाहतूक विभागाने पर्यायी रस्ते मार्ग प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहेत.
हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ते
– नवी मुंंबई भागातून डोंंबिवली, कल्याण दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वार, मोटार वाहन चालकांनी कल्याण फाटा येथे दत्त मंदिरा मागील शिळ गाव मार्गे दिवा, आगासन रेल्वे फाटक, दिवा-संदप रस्ता मार्गे, घारिवली, मानपाडा रस्त्याने शिळफाटा येथे यावे.
– मुंबई, ठाणे शहरांतून डोंबिवली, कल्याणच्या दिशेने येणाऱ्या मोटार कार, दुचाकी स्वारांनी मुंबई-नाशिक महामार्ग, माणकोली उड्डाण पूल, मोठागाव-डोंबिवली मार्गाचा वापर करावा. किंवा नाशिक महामार्ग-रांजनोली, भिवंडी बाह्यवळण रस्ता, कोनगाव-दुर्गाडी रस्त्याच्या वापर करावा.
– कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ शहरांतून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटार, दुचाकी स्वारांनी चक्कीनाका, मलंग रस्ता, नेवाळी नाका येथून उजवे वळण घेऊन पाईपलाईन रस्ता, खोणी नाका, निसर्ग हाॅटेल, तळोजा रस्ता एमआयडीसी रस्तेमार्गे इच्छित स्थळी जावे.
– कल्याण, डोंबिवलीतून ठाणे, मुंबईत जाणाऱ्या मोटार, दुचाकी स्वारांनी दुर्गाडी कोनगावमार्गे मुंबई-नाशिक महामार्गाने किंवा डोंबिवलीतून माणकोली पूल मार्गे इच्छित स्थळी जावे.
जड वाहने प्रवेश बंद
– मुंब्रा, कल्याण फाटा येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद असेल. ही जड, अवजड वाहने मुंब्रा बायपास, खारेगाव टोलनाका येथून इच्छित स्थळी जातील.
– कल्याणकडून मुंब्रा, कल्याण फाटा जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना काटई चौक (बदलापूर फाटा) येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने खोणी नाका, तळोजा एमआयडीसी रस्त्याने जातील.
– नवी मुंबई, तळोजा भागातून काटई चौककडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना खोणी नाका निसर्ग हाॅटेल येथे प्रवेश बंद. ही वाहने निसर्ग हाॅटेल येथे उजवे वळण घेऊन नेवाळी नाकामार्गे इच्छित स्थळी जातील.
– अंबरनाथ, बदलापूर येथून काटई चौक येथे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना खोणी निसर्ग हाॅटेल येथे प्रवेश बंद. ही वाहने तळाजो एमआयडीसी रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस अशा वाहनांना या बंदतून वगळण्यात आले आहे.
(शिळफाटा.)