प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेगाने हालचाली

संरक्षित वन क्षेत्रात असल्यामुळे गेली दोन वर्षे रखडलेला येऊर येथील प्रस्तावित पर्यटन केंद्राचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. वन विभागाने येऊरमधील पर्यायी जागा महापालिकेला सुचवली आहे. त्या जागेचा सर्वेक्षण अहवाल ठाणे महानगरपालिकेने वन विभागाला पाठवल्याचे कळते. वन विभागाने मंजुरी दिल्यावर आदिवासी विकास पर्यटन प्रकल्पाचा मार्ग खुला होणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर येथे येणाऱ्या पर्यटकांना जंगलाची आणि आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वन विभागाने एकत्रितपणे येऊर आदिवासी विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पासाठी महापालिकेला वन विभागाची परवानगी मिळाली होती. आमदार प्रताप सरनाईक या प्रकल्पासाठी आग्रही होते.

प्रवेश व स्वागत कक्ष, प्रशासकीय क्षेत्र, प्रदर्शन केंद्र, निवास व्यवस्था, निवारा उभारण्याचा प्रस्ताव आहे. माहितीफलक, मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, जंगलातील विविध शोभेच्या वस्तू, आसन व्यवस्था, नाल्यावरील लाकडी पूल असे पर्यटनपूरक घटक पर्यावरपूरक पद्धतीने साकारण्यात येणार आहेत.

मात्र या प्रकल्पाची जागा संरक्षित क्षेत्रात येत असल्याने गेली दोन वर्षे प्रकल्पाचे काम रखडले होते.

या प्रकल्पासाठी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केल्यावर अखेर वन विभागाने खासगी वनक्षेत्राची जागा महापालिकेला सुचवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ५ डिसेंबरला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येऊरमधील अन्य जागेची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या या जागेला शुक्रवारी भेट दिली. वन विभागाने सुचवलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून या प्रकल्पाविषयी महापालिका आणि वन विभागाच्या स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत. या संदर्भातील ऑनलाइन अहवाल यापूर्वीच वन विभागाकडे पाठवला असल्याचे ठाणे महानगरपालिकेतील सूत्रांनी सांगितले.

येऊर पर्यटन केंद्रासाठी महापालिका वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. संरक्षित जागेमुळे अडलेला हा प्रकल्प आता वन विभागाने अन्य जागा सुचवल्यामुळे लवकर मार्गी लागेल. या जागेचे सर्वेक्षण करून पाठवलेल्या अहवालावर वन विभागाने मंजुरी दिली आणि जागा सुपूर्त केली की पर्यटकांसाठी या प्रकल्पाचे काम सुरू होईल.

– हनुमंत येमेलवाड, कार्यकारी अभियंता, ठाणे महानगरपालिका