अंबरनाथः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना शहरातील विविध समस्यांवरून स्वपक्षियांच्याच टिकेला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपू्र्वी अंबरनाथच्या पाणी प्रश्नावरून आणि आता विजेच्या समस्येवरून अंबरनाथ शिवसेनेचे माजी शहप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नाव न घेता १५ वर्षांच्या कुंभकर्णाला आम्ही जागा केला अशी आमदार किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
अंबरनाथ शहरावर गेल्या काही वर्षात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. येथील नगर पालिका, आमदार आणि खासदारही शिवसेनेचे आहेत. शिवसेनेतील दुफळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच वर्चस्व शहरात पहायला मिळाले. मात्र शहरात गेल्या काही वर्षांपासून दोन गट उघडपणे एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या दोन आठवड्यात या कुरघोड्यांचे अनेक अंक पाहायला मिळाले. काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात पाणी आणि वीजेच्या समस्येने डोके वर काढले होते. त्यावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा दिला होता. त्यानंतर प्राधिकरणाने वीज समस्येमुळे पाणी समस्या वाढल्याचे सांगितल्याने वाळेकरांनी महावितरणाकडे मोर्चा वळवला. त्यानंतर संयुक्त बैठकीनंत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावर काही अंशी दिलासा मिळाला. त्यामुळे याचे श्रेय घेण्यासाठी वाळेकर यांनी शिवसेनेच्या वकीने फलकबाजी केली. त्याच वेळी नगरविकास विभागाने अमृत योजनेतून अंबरनाथसाठी पाणी योजना जाहीर केली. त्याची फलकबाजी आमदार डॉ. किणीकर यांनी केली. शहराच्या पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर एकाच पक्षाच्या या दोन गटाचे बॅनर झळकले होते. दोन्हींवर शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. त्यामुळे पक्षातच दुफळी असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. याप्रकरणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा : कल्याण रिंग रोड पूर्णत्वाकडे, प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण; एमएमआरडीए मुख्यालयात पार पडली बैठक
नेमकी टीका काय ?
काही जणांना आपण केल्यानंतर जाग येते. ती येणे गरजेचे आहे. लोकांना जागी करणे शिवसेना शहर शाखेचे काम आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. इथे काही लोक पंधरा वर्ष झोपलेले होते. त्यांना शिवसैनिकांनी जागे केले. जाग आलेल्या त्या कुंभकर्णाचे आभार मानतो, अशी टीका वाळेकर यांनी मंगळवारी केली. त्यापूर्वी पाणी प्रश्नावर बोलताना, पाणी वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी चिखलोलीचे पाणी मिळवले. मात्र पाच वर्ष धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. गाळ काढला, खर्च केला मात्र उंची काही वाढली नाही. उंची वाढवणे आणि लोकांना सुविधा देण्यासाठी सुरूवातीला स्वतच्या विचारांची उंची वाढवाली लागेल, असा टोला आमदार डॉ. किणीकर यांना लगावला होता.
हेही वाचा : कल्याण: दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाट रखडल्याने प्रवाशांचे हाल
आम्ही शहरातील नागरिकांच्या समस्या घेऊन प्रशासनासमोर गेलो. त्यावर तोडगा काढला आणि नागरिकांना दिलासा दिला. काही लोकांना समस्या सोडवता आल्या नाहीत. त्यामुळे झोपलेल्यांना कुंभकर्ण म्हणालो.
अरविंद वाळेकर, माजी शहरप्रमुख, अंबरनाथ.