मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथील स्मारक पाच वर्षांपासून तांत्रिक अडचणींच्या फेऱ्यात; स्थान निश्चितीचा वाद
देशात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष धूमधडाक्यात साजरे होत असताना खुद्द बाबासाहेबांचे आजोळ असलेल्या मुरबाडजवळील आंबेटेंबे येथील भीमाई स्मारक मात्र दुर्लक्षित असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी जतन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये होताना दिसतो आहे. मुरबाडजवळील आंबेटेंबे हे डॉ.आंबेडकरांच्या मातोश्री भीमाई यांचे जन्मगाव असल्याचे काही पुराव्यांवरून गृहीत धरण्यात आले आहे. मेजर धर्माजी मुरबाडकर कुटुंबीयांचे हे गाव होते. त्यांच्याच भीमाई या कन्या. यामुळे आपल्या आजोळी बाबासाहेब अनेकदा येत असत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावातील जुणी जाणती मंडळी अजूनही बाबासाहेबांच्या भेटीच्या आठवणी जागविताना दिसतात. गेल्या काही वर्षांत येथील तरुणांच्या एका गटाने हा इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यात काही प्रमाणात यशही आले. मुरबाडकर कुटुंबीयांच्या पाऊलखुणा असलेले आंबेटेंबे हेच गाव भीमाई यांचे जन्मगाव असल्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर तेथे स्मारकासाठी प्रयत्न सुरू झाले. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनीही प्रत्यक्ष भेट देऊ न स्मारकाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. यासाठी १४ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. साधारणपणे २०११ मध्ये स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणीच्या फेऱ्यात हे काम रखडल्याने बाबासाहेबांच्या आजोळी स्मारक दुर्लक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबतच्या तांत्रिक बाबीही २०११ सालीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र स्मारकाचे बांधकाम रखडलेले असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. किमान बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांत तरी स्मारकाचे काम पूर्ण होईल अशी आशा आम्हाला आहे. मात्र कामाची संथगती पहाता ती पूर्ण होईल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया या गावात व्यक्त होताना दिसत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
असे असेल स्मारक
स्मारकाबाबत अनेक मतभेद असले तरी स्मारकाच्या निमित्ताने मुलींची निवासी शाळा, वसतिगृह, ध्यानधारणा केंद्र, सांस्कृतिक केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उद्यानाचा समावेश स्मारकात होणार आहे. याबाबतचा आराखडाही मंजूर झाला असून प्राथमिक कार्यही सुरू झाले आहे.गटबाजीमुळे स्मारक रखडले
स्मारकासाठी गावातील तसेच आसपासच्या परिसरातील विविध गट प्रयत्न करत होते. मात्र त्यात कोणतीही एक समिती स्थापन झाली नव्हती. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात मतभेद होत असत. संघटितपणे प्रयत्न होत नसल्याने स्मारकाचे काम दुर्लक्षित झाल्याची भावना या भागातील काही अनुयायींनी बोलून दाखवली.सध्या स्मारकाचा एक भाग म्हणून समाज मंदिराचे काम सुरू आहे. स्थानिक जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या माध्यमातून रस्ते आणि शौचालये होत आहेत. शासनाकडून निधी मंजूर झाला. मात्र इथपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे हे स्मारक रखडले आहे.
-भाऊ तांबे, स्मारक समिती, आंबेटेंबेआंबेटेंबे हे माता भीमाईंचे मूळगाव नसून काही लोकांच्या हट्टापायी हे स्मारक तिथे गेले आहे. आंबेटेंबे येथे काही झाल्याचा पुरावा नसून बोगस पुराव्यांच्या आधारे स्थाननिश्चिती करण्यात आली आहे. मात्र स्मारक झाल्यास आनंदच होईल. पण शहरात झाले असते तर ते सर्वाना सोयीचे झाले असते.
-रवी चंदणे, शिवळे, मुरबाड.