मुंबई शहरातील व्यवहार खऱ्या अर्थाने चालवणाऱ्या बहुतेक नोकरदार चाकरमान्यांचा खरा भार हा चौथ्या मुंबईतील अंबरनाथ आणि बदलापूर यांसारख्या शहरांवर आहे. स्वस्त, निसर्गरम्य ठिकाणी घर घेणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरलेल्या या शहरांमधील रेल्वे स्थानके आणि बाजारपेठा मात्र कोंडीत अडकली आहेत. बेशिस्त आणि फुकटय़ा पार्किंगसाठी आग्रही असलेले वाहनचालक, त्याकडे दुर्लक्ष करणारे वाहतूक पोलीस, अनधिकृत फेरीवाले, वाहतूक कोंडीवर नियोजनबद्ध तोडगा काढण्यास अनास्था दाखवणारे पालिका प्रशासन यांमुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या वर्दळीच्या ठिकाणच्या कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे.

दोन ते तीन दशकांपूर्वी शांत आणि निसर्गरम्य शहरे म्हणून नावारूपाला आलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचे सध्या अतिशय झपाटय़ाने नागरीकरण होऊ लागले आहे. सध्या अंबरनाथ शहरात ८४ हजार तर बदलापुरात एक लाख दोन हजार मालमत्ता आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांची एकत्रित लोकसंख्या सहा लाखांच्यावर पोहोचली आहे. त्याचा भार रेल्वे स्थानके, बाजारपेठा आणि स्थानकाबाहेरील रस्त्यांवर पडताना दिसतो. अंबरनाथ शहरातील पूर्वेतील शिवाजी चौक आणि पश्चिमेतील पालिका मुख्यालयापर्यंतच्या रस्त्यावर सर्वाधिक गर्दी असते. शहराच्या दोन्ही बाजूंना बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा थांब्यांनी जागा अडवली आहे.

बेशिस्तपणे वाहने उभी करणे, प्रवासी मिळवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागा नसतानाही बेकायदेशीरपणे दुहेरी रांगा लावणे अशा गोष्टींमुळे  पादचाऱ्यांना स्थानकाबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यात फेरीवाल्यांचे ऐन पदपथावरील बस्तानही त्रासदायक बनत चालले आहे. स्थानकाबाहेर काही फुटांवर गेल्यानंतर राजकीय पक्ष पुरस्कृत खाद्यपदार्थाच्या गाडय़ांनी रस्त्याचा काही भाग गिळंकृत केला आहे. त्याचाही सामना पादचाऱ्यांना करावा लागतो. पुढे गेल्यानंतर बेकायदा पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील होते. हुतात्मा चौक किंवा वेल्फेअर सेंटरकडे जाताना लागणाऱ्या दुचाकींच्या अडवणुकीमुळे पादचाऱ्यांच्या त्रासात आणखी भर पडते. मोठा गाजावाजा करत सुरू केलेले अर्धवट वाहनतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची इच्छाशक्तीच पालिका प्रशासनाकडे नसल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. या सर्वामध्ये बेशिस्त वाहनचालकांची वेगळी भर पडत असल्याने स्थानक परिसरातील वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. पश्चिमेतही वेगळी परिस्थिती नसून स्थानक ते पालिका मुख्यालय, तसेच पोलीस पेट्रोल पंप आणि अंबरनाथ पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्याचा बहुतांश भाग रिक्षाचालकांनी व्यापला आहे. दीडशे फुटांची मर्यादा फेरीवाल्यांनी कधीच ओलांडली आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागालाही ही रेषा सापडेनाशी झाली आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीबाबत आनंदी आनंदच पाहायला मिळतो आहे.

बदलापुरातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. सर्वत्र रिक्षांचे साम्राज्य पाहायला मिळते. शहराच्या दोन्ही बाजूला डझनावारी रिक्षा थांबे आहेत. त्यात भर म्हणून अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी मिनीडोअर, जीप, रिक्षांचे थांबेही पश्चिमेतील स्कायवॉकखाली लागलेले दिसतात. पूर्वेतही स्थानक ते थेट कात्रप मार्गावरील उड्डाणपूल तसेच दुसरीकडे धन्वंतरी रुग्णालयापर्यंत रिक्षांची रांग असते. स्थानकाशेजारील संजीवनी सभागृहासमोर असलेली पार्किंग, दोन्ही बाजूंचे जवळपास चार रिक्षा थांबे, बेकायदेशीर पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकींमुळे रस्त्यातून अवघी एक दुचाकी जाईल इतकीच जागा शिल्लक असते. त्यामुळे हा रस्ता आहे का, असाच प्रश्न पडतो.

पश्चिमेतील वैशाली टॉकिज परिसरातून सवरेदय नगरकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर सायंकाळी एका व्यक्तीचे चालणेही अशक्य होत असते. त्यामुळे अनेकदा येथे वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे देवधर मार्केटशेजारील रस्त्यावरही दुचाकींचे साम्राज्य पहायला मिळते. येथील रहिवासी संकुलाचा रस्ताही अनेकदा दिवसभरासाठी बंद पडलेला असतो. त्यात फेरीवाले, दुकानांचे अतिक्रमण यांची भर पडते. सायंकाळच्या वेळी तर रेल्वेतून उतरणारे प्रवासी, रिक्षाचालकांची प्रवासी मिळवण्याची घाई आणि स्थानकाबाहेरील बाजारपेठेतून मार्ग काढणारी वाहने यांमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे येथे अनेकदा रस्ता काही मिनिटांसाठी बंद पडलेला असतो. त्याचा सर्वसामान्य नागरिक आणि प्रामाणिक वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

या वाहतूक कोंडीवर स्थानिक पालिका प्रशासन, वाहतूक शाखा, पोलीस, व्यापारी, रिक्षा संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे तोडगा काढणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वाहतूक आराखडा तयार केला होता. मात्र त्यासाठी पालिकेकडून आवश्यक मनुष्यबळ, विविध साहित्यांचा पुरवठा होऊ शकत नसल्याने वाहतूक पोलीसही हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यात पोलिसांचीही संख्या तोकडी असल्याने त्याचा परिणाम कारवाईवर दिसून येतो.

जितके वाहतूक शाखेचे पोलीस आहेत, तेही शहराबाहेरील महामार्गावर अनावश्यक तपासणी करताना पाहायला मिळतात. त्यात बदलापूर पालिकेचे एक वाहनतळ बांधून बंद आहे, तर दुसरे वाहनतळ सक्तीमुळे दुर्लक्षित आहे. त्यामुळे वाहनचालक त्याकडे जाताना दिसत नाहीत. त्याचा थेट परिणाम कोंडीवर होतो आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील रिक्षाथांबे स्थानकापासून काही अंतरावर नेण्याचा विषय पालिका सभागृहात आला होता. मात्र राजकीय हितसंबंध जोपासण्यापायी त्यावर काहीही होऊ  शकले नाही. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांबाहेरील रिक्षाथांबे काही अंतरावर स्थलांतरित केल्यास निम्म्याहून अधिक वाहतूक कोंडीची समस्या संपलेली असेल. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काची जागा दिल्यानंतर वाहतूक कोंडीत असलेला त्यांचा भार कमी होईल, तसेच वाहनतळाचा प्रश्न सुटल्यासही स्थानकाबाहेर होणाऱ्या बेकायदा पार्किंगवरही आळा बसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिक आणि वाहनचालकांनीही यात आपली जबाबदारी ओळखत कोंडी न होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वाढत्या शहरांत इतर सोयीसुविधा असल्या तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असून यावर वेळीच तोडगा न काढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.