सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील गृहनिर्माण क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण असले तरी कल्याण शहराच्या पलीकडे या भागांत परिस्थिती तुलनेने बरी आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील मालमत्ता प्रदर्शनातही या येथील प्रकल्प प्राधान्याने मांडले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. वरकरणी स्वस्त घरांचा हा पर्याय सोयीचा वाटत असला तरी भविष्यात ते महाग ठरू शकण्याची भीती नियोजनकर्ते व्यक्त करीत आहेत.
गेली काही वर्षे जानेवारीमध्ये ठाणे परिसरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्याची टूम निघाली आहे. त्यामुळे स्वत:चे घर शोधू पाहणाऱ्यांना एकाच छताखाली शेकडो प्रकल्पांचे पर्याय या प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध होत असतात. पूर्वी हे प्रदर्शन फक्त ठाण्यालाच व्हायचे, पण अलीकडे कल्याण-अंबरनाथ परिसरातही गृहप्रकल्पांचे बाजार भरू लागले आहेत. कारण सर्वसामान्यांना परवडणारी घरे आता याच भागात उपलब्ध आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी या स्वस्त घरांच्या बाजारपेठेस ‘चौथी मुंबई’ असे गोंडस नाव दिले आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील गृहनिर्माण क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण असले तरी कल्याण शहराच्या पलीकडे या भागांत परिस्थिती तुलनेने बरी आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील मालमत्ता प्रदर्शनातही या येथील प्रकल्प प्राधान्याने मांडले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
ठाणेच नव्हे तर डोंबिवलीतही किफायतशीर दरात घर मिळणे कठीण झाले आहे. त्या तुलनेत अंबरनाथ बदलापूर येथे किफायशीर किमतीत म्हणजे २० ते २५ लाखांत येथे घर मिळू शकते. याशिवाय घोडबंदर रोडवरील भाइंदर पाडा ते पारसिकच्या डोंगरापर्यंत अंदाजे सात ते आठ किलोमीटरच्या परिघात ठाणे शहराचे विस्तारीकरण झाले आहे. शहर विस्तारीकरणाची ही कमाल मर्यादा आहे. तिथून ठाणे स्थानकात रोज ये-जा करणे अतिशय दुरापास्त आहे. त्या तुलनेत अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्वस्त आणि रेल्वे स्थानकांपासून जवळ घरे उपलब्ध आहेत. वरकरणी स्वस्त घरांचा हा पर्याय सोयीचा वाटत असला तरी भविष्यात ते महाग ठरू शकण्याची भीती नियोजनकर्ते व्यक्त करीत आहेत.
एक म्हणजे अंबरनाथ-बदलापूरमधील पायभूत सुविधा येथे येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या आहेत. या दोन्ही शहरांमध्ये आठ किलोमीटरचे अंतर असून दोन्ही बाजूंनी मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहू लागले आहेत. नवीन निवासी प्रकल्प पायी चालून जाता येण्याजोग्या नाहीत. या दोन्ही शहरांना स्वतंत्र अशी परिवहन सेवा नाही. स्वत:ची बससेवा असणाऱ्या सोसायटय़ांची संख्या हाताच्या बोटावर मोजता इतकी असेल. त्यामुळे उपनगरी रेल्वेतून उतरल्यावर केवळ रिक्षा हाच शहरांतर्गत वाहतुकीचा पर्याय आहे. शहरांचा परीघ सरासरी तीन किलोमीटर आहे. तो येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे तो विस्तारणार आहे.
ठाण्यात किमान रडत रखडत का होईना पण टीएमटी आहे. काही भागात बेस्ट तसेच एनएमएमटीची सेवा आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये तसे काहीही दृष्टिक्षेपातही नाही. ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियोजित मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तरी होता. अंबरनाथ-बदलापूरमध्ये घरे घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तशी सोय सध्या तरी दृष्टिपथात नाही. फक्त स्वस्त दर हेच अंबरनाथ-बदलापूरच्या घरांचे प्रमुख आकर्षण आहे. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही शहरांच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेणे उचित ठरेल.
काही जमेच्या बाजू
सध्या विषम वितरण व्यवस्थेमुळे या दोन्ही शहरांतील काही भागांत अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तरीही ठाणे परिसरातील इतर शहरांच्या तुलनेत या शहरांच्या भविष्यकालीन गरजेसाठी पाण्याची काही प्रमाणात का होईना येथे तरतूद आहे. लहानसे का होईना चिखलोली हे अंबरनाथ पालिकेच्या मालकीचे धरण आहे. त्याचप्रमाणे अलीकडेच भोज धरणही पाणी पुरवठय़ासाठी बदलापूर पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याण-बदलापूर तसेच काटई ते चौक या रस्त्यांची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते टोल फ्री आहेत. बारवी विस्तारीकरण मार्गी लागल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या वाढीव जलसाठय़ात या दोन्ही शहरांच्या भविष्यकालीन पाणी पुरवठय़ासाठी आरक्षण आहे.
प्रशांत मोरे
जिकिरीचा प्रवास
* सध्या तरी उपनगरी रेल्वे, रिक्षा ही दोनच वाहतुकीची साधने.
* बदलापूरहून कार्यालयीन वेळेत सहकुटुंब मुंबईच्या दिशेने येणे अत्यंत जिकिरीचे.
* उल्हासनगरमधील एका खासगी कंपनीने अंबरनाथ-बदलापूर दरम्यान परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न रिक्षा संघटनेने हाणून पाडला.
* रिक्षांना मीटर शोभेपुरते त्यामुळे प्रवाशांची भाडय़ातून लूट.
स्थानकातील कोंडी
ठाणे आणि डोंबिवली या दोन स्थानकांमध्ये सरकते जिने बसवून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे कल्याणपल्याडच्या रेल्वे स्थानकांकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अंबरनाथमध्ये स्कायवॉक फक्त पश्चिमेलाच तोही अर्धवट आहे. कल्याण-बदलापूर रोडच्या पलीकडे महात्मा गांधी शाळा असतानाही अलीकडेच पायउतार झाल्याने हा स्कायवॉक सुरक्षिततेच्या दृष्टीने तसा कुचकामी ठरला आहे. गेल्या आठवडय़ात एमएमआरडीएचे आयुक्त मदान अंबरनाथला आले. त्यांनी हा स्कायवॉक पाहिला. रेल्वे स्थानकातील बदलापूर दिशेच्या पादचारी पुलाची दुर्दशा झाली आहे. बदलापूर स्थानकात तर याहून अधिक गंभीर परिस्थिती आहे. प्रवाशांच्या तुलनेत फलाटावरील पादचारी पूल खूपच अरुंद आहेत. त्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. नव्या गृह प्रकल्पांमुळे बदलापूरची लोकसंख्या येत्या दोन वर्षांत किमान एक लाखानी वाढेल, असा अंदाज आहे.