अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणारे पिण्यायोग्य पाणी गेल्या दिवसांपासून गढूळ येत असून त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना गढूळ पाण्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही प्राधिकरण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

अंबरनाथ शहरातील मोठा भाग आणि संपूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरणाच्या वतीने बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीतून बॅरेज बंधाराय येथे पाणी उचलले जाते. प्राधिकरणाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात यावर प्रक्रिया करून ते विविध जलकुंभांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. पावसाळा सुरू होताच नदीत गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रक्रिया केल्यानंतरही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होता. गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा;’ह’ प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी

गळक्या जलवाहिन्या शोधा

नागरिकांनी आपल्या पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळजोडणी गटार भागातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ही जलवाहिनी गटारीतून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सोबतच बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी, असेही आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

हेही वाचा – झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

इथे नोंदवा तक्रार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अंबरनाथ (पूर्व / पश्चिम) :- ९२२०६०६८५४, ९८६०३२४२३६. तर बदलापूर पूर्व ९८६९७८६१५१, पश्चिम ८९८३२८०२३२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक तक्रार नोंदवू शकतात.