अंबरनाथ, बदलापूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसाठी झालेल्या प्रभागांच्या आरक्षण सोडतीत या दोन्ही शहरांमध्ये अनेक दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी, बदलापूरचे भाजप नेते राम पातकर अशा नेत्यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. अंबरनाथ येथे प्रस्थापितांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसत असताना बदलापूरमध्ये मात्र दिग्गज सुरक्षित झाले आहेत.  
अंबरनाथ आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप या दोन पक्षांची युती झाल्यामुळे या नगरपालिकेत हे पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अंबरनाथ येथे शिवसेनेचे, तर बदलापुरात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे जागावाटपावरून या दोन्ही शहरांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही नगरपालिकांमध्ये वाढीव प्रभाग, बदललेली प्रभाग रचना व पन्नास टक्के महिला आरक्षण लागू झाले आहे. अंबरनाथमध्ये प्रभाग रचना व महिला आरक्षणाचा फटका विद्यमान नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना बसला आहे. शिवसेनेचे नगरसेवक कुणाल भोईर यांचा प्रभागही आरक्षित झाला आहे. प्रभागरचनेमुळे कबीर गायकवाड यांनादेखील धक्का बसला आहे.
बदलापुरात वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, श्रीधर पाटील, संजय गायकवाड यांसारख्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षणात सुरक्षित झाले आहेत. येथे दिग्गजांपैकी राम पातकर यांना महिला आरक्षणाचा फटका बसला आहे. बदलापूरच्या कात्रप परिसरातील सलग पाच प्रभागांत महिला आरक्षण पडल्याने प्रकाश पाटील, नरहरी पाटील, विवेक मोरे, अविनाश मोरे या नगरसेवकांना याचा धक्का बसला आहे. या वेळी बदलापूर व अंबरनाथ येथे अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जागा वाढल्या असून अनुसूचित जमातींच्या जागा दोन्हीकडे दोन-दोन आल्या आहेत. मागास प्रवर्गात बदलापूरमध्ये महिलांसाठी सात जागा तर खुल्या प्रवर्गात महिलांसाठी १२ जागा तरअंबरनाथमध्ये मागास प्रवर्गात महिलांसाठी आठ, व खुल्या प्रवर्गात सोळा जागा महिलांना मिळाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी महिला आरक्षणामुळे संधी गमावलेले पुरुष नगरसेवक आपल्या पत्नीलाच ती उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.
बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. २१, २४ या प्रभागांमध्ये पूर्वी महिलांसाठी राखीव असताना पुन्हा महिलांसाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त करीत अपिलात जाण्याचे पत्र बदलापूर पालिकेला दिले आहे.
 संकेत सबनीस, अंबरनाथ