ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधर पावसामुळे दोनही जिल्ह्यांमधून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. याच नदीकिनारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाण्याची पातळी वाढल्यास हे केंद्र बंद करण्याची वेळ येते. आता इशारा पातळीपासून धोका पातळी अवघे काही सेंटीमीटर असल्याने पाणी पातळी अशीच वाढल्यास हे केंद्र बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे संपूर्ण बदलापूर शहर आणि अंबरनाथ शहराच्या काही भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
… तर जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे लागेल –
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाणी पातळी वाढत राहिल्यास जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे लागेल. त्यामुळे पाणी पातळी कमी होईपर्यंत केंद्र सुरू होऊ शकणार नाही. या काळात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे सांगत पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अंबरनाथ विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांनी दिली आहे.
उल्हास नदी इशारा पातळीवर, बदलापूर पालिकेकडून सतर्कतेसाठी सूचना
नदीची पाणी पातळी वाढल्यास या केंद्रावर परिणाम होतो –
बदलापूर आणि अंबरनाथ या दोन शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापूर संपूर्ण शहर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. तर अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागाला बदलापुरातूनच पाणीपुरवठा केला जातो. बदलापुरात बॅरेज बंधारा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी उचल केली जाते. तेथे जलशुद्धीकरण करून हे पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पोहोचवले जाते. नदीची पाणी पातळी वाढल्यास या केंद्रावर परिणाम होतो. परिणामी पाणीपुरवठा बंद होतो. अंबरनाथ शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून तसेच चिखलोली येथील धरणातूनही पाणीपुरवठा होतो.