लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथः गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वारंवार मागणी करूनही मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी पुन्हा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धाव घेत पाणी टंचाई मिटवण्याची आग्रही मागणी केली. त्यावर लवकरच अतिरिक्त चार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे अरविंद वाळेकर यांनी दिली आहे.
अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून तसेच चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात वाढलेली लोकसंख्या आणि पर्यायाने वाढलेली पाण्याची मागणी पूर्ण करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात वर्षभर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याविरूद्ध सर्वपक्षियांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
हेही वाचा… आयुक्तांचे आदेश डावलून क, फ प्रभागातील सफाई कामगार फेरीवाला हटाव पथकात ठाण मांडून
स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी चक्क ठिय्या मांडला होता. तर नुकत्याच एका आंदोलनात कॉंग्रेसच्या वतीने रक्तदान करत रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. अंबरनाथ पश्चिमेतील सुमारे १२ प्रभागांत पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हेही वाचा… डोंबिवली-कल्याणमधील नाले गाळ, कचऱ्याने भरलेले; प्रशासन अद्याप ठेकेदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
सातत्याने नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. कमी दाबाने येणारे पाणी, दोन किंवा तीन दिवसांनी येणारे पाणी, अनियमीतता या प्रश्नांवर आम्ही जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांशी चर्चा केल्याचे अरविंद वाळेकर यांनी सांगितले. यापूर्वीही जीवन प्राधिकरणाला पाणी प्रश्नाबाबत निवेदन दिले होते. त्यांनी पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा देत पाणी प्रश्न लवकरच मिटवू असे सांगितले होते.
हेही वाचा… काटई गावात विवाहितेला कुटुंबीयांकडून बेदम मारहाण
मात्र त्यानंतरही पाणी प्रश्न जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे वाळेकर यांनी सांगितले. उपस्थित अधिकाऱ्यांनी लवकरच अंबरनाथ शहरासाठी अतिरिक्त चार दशलक्ष लीटर पाणी दिले जाईल, असे आश्वासन दिल्याचेही वाळेकर यांनी स्पष्ट केले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास मोर्चाचा इशाराही शिवसेनेच्या वतीने वाळेकर यांनी दिला आहे.
नागरिकांची चिंता वाढली
जीवन प्राधिकरण सातत्याने आश्वासनांवर नागरिकांची बोळवण करत असून पाणी प्रश्न सुटण्यापेक्षा अधिकच जटील होत चालला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू होणार असून पाणी नियोजनासाठी पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे आधीच पाणी टंचाई आणि त्यात पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने नागरिक चिंतेत सापडले आहेत.