अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी कोकण पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर मत पत्रिकेसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुजाता भोईर यांनी काढलेला सेल्फी फोटो सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीत मत पत्रिका मतपेटीत टाकण्यापूर्वी हे छायाचित्र काढण्यात आले होते.
हेही वाचा : ठाण्यातील तरुणाईला गांजा, चरस आणि एमडीचा विळखा; मागील दीड वर्षांत चार हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल
मुळात कोणत्याही निवडणुकीत मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यावर निर्बंध असतात. त्यातही मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यानंतर तेथील मतदान अधिकारी मोबाईल मतदान करेपर्यंत स्वतःकडे जमा करून ठेवत असतात. असे असतानाही सुजाता भोईर यांनी फोटो काढल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.