नवनिर्वाचित नगरसेवकांच्या अतिउत्साहावर पाणी

अंबरनाथ नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या ५२० ठरावांपैकी ४८८ ठराव रद्द करण्यात आले असून या ठरावांची अंमलबजावणी न करण्याचे परिपत्रक पालिकेतील खातेप्रमुखांना मुख्याधिकाऱ्यांनी नुकतेच जारी केले आहे. पालिकेच्या नव्या उत्साही सदस्यांनी अज्ञानाच्या भरात केलेल्या बहुतेक ठरावांची गत अखेर रद्द होण्यात झाली.
अंबरनाथ नगरपालिकेच्या एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा जुलै महिन्यात पार पडली होती. या सभेत तब्बल अडीचशे कोटी रुपयांचे ५२० ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये बहुतांश ठराव हे रस्तेकामांचे आहेत. मात्र, अर्थसंकल्पीय तरतूद नसतानाही ठराव मंजूर करण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव पालिकेच्या सदस्यांनीच रद्द केले. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तसेच या संदर्भातील परिपत्रक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जारी केले.
रद्द करण्यात आलेल्या ठरावांमधील कामे ही मुख्यत्वे रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, पथदिवे व हायमास्ट बसविणे तसेच गटारे बांधणे व दुरुस्ती करणे आदी स्वरूपाची आहेत. बहुतांश प्रभागात ही कामे ७५ लाख ते १० लाखांच्या किमतींमध्ये प्रस्तावीत करीत प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यासाठी सभागृहाने मंजूर केली होती.

Story img Loader