गेल्या आठवड्यात अंबरनाथ पश्चिमेतील जावसई येथील तलावात एका २० वर्षीत तरूणाची हत्या करून मृतदेह बांधून फेकण्यात आला होता. मृताची ओळख पटली असली तरी आरोपींची माहिती नव्हती. अखेर अंबरनाथ पोलिसांनी या हत्येची उकल केली असून कानशिलात लगावत धमकी दिल्याने ही हत्या झाल्याचा खुलासा अंबरनाथ पोलिसांनी केला आहे. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यात अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. यात आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
उल्हासनगरच्या हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह ५ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पश्चिमेतील जावसई येथील तलावात आढळून आला होता. या तरूणाची हत्या करत त्याचा मृतदेह गोणीच्या कापडात बांधून मृतदेहाला दोन्ही -बाजूंना दगड बांधत तो तलावात फेकण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतून आरोपींनी हे केले होते. विशाल दोन दिवसांपासून घरी आला नसल्याची तक्रार आणि त्याचा मृतदेह साडपण्याची वेळ एकच झाली. कुटुंबियांनी मृताची ओळख पटवली होती. मात्र आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र मृताच्या परिसरात चौकशी केल्यानंतर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला.
कानशिलाग लगावत जीवे मारण्याची धमकी दिली होती –
मृत विशाल राजभर आणि या प्रकरणातील आरोपी सचिन चौहान यांच्या वाद होते. आपल्या मित्राला धमकी दिल्याने विशाल याने आरोपीच्या कानशिलाग लगावत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा रान मनात धरतून सचिन चौहान याने अजय जैस्वार, रोनश सहानी, समीर सिद्दीकी उर्फ छोटा बाबू आणि एका अल्पवयीन मुलाच्या साथीने विशाल राजभर याला अंबरनाथच्या आयुध निर्मानीत एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे विशालला मारहाण करत त्याची हत्या केली. त्यानंतर विशालचा मृतदेह एका गोणीत तारेच्या सहाय्याने आणि साडीच्या मदतीने बांधून त्याला दगडाचे वजन बांधून तलावात फेकण्यात आला. मृतदेह बांधण्यासाठी ज्या तारेचा आणि साडीच्या कपड्याचा वापर करण्यात आला होता. त्याच आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
याप्रकरणी रोशन साहनी याला अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सचिन चौहान, अजय जैस्वार, समीर सिद्दीकी या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशमध्ये रवाना झाल्याची माहिती अंबरनाथचे पोलीस उपायुक्त जगदीश सातव यांनी दिली. यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कोते उपस्थित होते.