अंबरनाथ : कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामगारांनी केलेल्या संपामुळे गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने ऐन महाशिवरात्रीत शहरभर कचऱ्याचे ढीग लागले होते. हा प्रश्न पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारून सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आठवडाभरानंतर स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत किणीकर यांनी ही मागणी केली.

अंबरनाथ शहरातील कचराप्रश्न विविध टप्प्यांवर गेल्या काही वर्षात रखडल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांपूर्वी अंबरनाथच्या वेशीवर मोरिवलीजवळ बेकायदा पद्धतीने कचराभूमी तयार करण्याचा प्रताप पालिका प्रशासनाने केला होता. त्यानंतर नागरी वस्तीजवळ पर्यायी जागेत कचरा हलवून स्थानिक नागरिकांच्या रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. सध्या अंबरनाथसह बदलापूर आणि उल्हासनगर शहरांचा संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र हे सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात कचराकोंडी झाल्याचे चित्र होते.

कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने गेल्या आठवड्यात अंबरनाथमध्ये कचराकोंडी झाली होती. कचरा उचलला जात नसल्याने अंबरनाथ शहरातील परंपरागत शिवमंदिर जत्रा असतानाही शहरात मात्र कचऱ्याचे ढीग होते. पालिका प्रशासनाने यावर स्वतची यंत्रणा उभारून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कचरा प्रश्न संपुष्टात आला नाही. सुमारे ८० कोटी रूपयांचा कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आले आहे.

ही समस्या उद्भवल्यानंतर यावर लोकप्रतिनिधींनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यात काही राजकीय कुरघोड्या असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. आता आठवडाभरानंतर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करून करार रद्द करण्याची मागणी केली आहे. सोबतच या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही किणीकर यांनी केली आहे. याप्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader