अंबरनाथः वाढत्या शहराची अग्नीसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने नव्या सात वाहनांसाठी निविदा मागवल्या आहेत. दोन फायर वॉटर टेंड़र वाहने, दोन मल्टी पर्पस फायर टेंडर वाहने, एक वॉटर ब्राऊजर, दोन क्विक रिस्पोन्स वाहने अशी सात वाहने पालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी ११ कोटी ६४ लाखांचा खर्च येणार आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने अग्नीशमन दलात नव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तर अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेचे संयुक्त उंच शिडीचे वाहन दोन्ही शहरात कार्यरत आहे.

अंबरनाथ शहरात अनेक नामांकीत बांधकाम कंपन्यांचे मोठमोठे गृहसंकुले उभी राहत आहेत. या टोलेजंग इमारतींना अग्नीसुरक्षा देण्याच्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांनी मिळून संयुक्त उंच शिडीचे वाहन खरेदी केले होते. त्यानंतर या वाहनाचा वापर शहरात गरजेनुसार होतो आहे. मात्र शहराची लोकसंख्या पाहता शहरात आगीचे प्रकारही वाढण्याच भीती आहे. या वाढत्या प्रकारांना रोखण्यासाठी आणि अग्नीशमन दल सक्षम करण्यासाठी काही दिवसांपासून अंबरनाथ नगरपालिकेने तयारी सुरू केली होती. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने २७ नव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. या सर्वांचे अग्नीशमन प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शहराच्या पश्चिम भागात पालिकेचा स्वतंत्र अग्नीशमन केंद्र आहे. तर पूर्वेतही एका ठिकाणी केंद्र सज्ज ठेवले आहे.

नव्याने कर्मचारी दाखल झाले असले तरी पालिकेकडे जुनीच दोन अग्नीशमन वाहने उपलब्ध होती. त्यामुळे नव्या वाहनांची गरज पालिका प्रशासनाला होती. अनेकदा एकाच वेळी आगीच्या किंवा आपातकालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहनांची संख्या कमी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरू केली होती. अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नवीन फायर फायटींग आणि इतर वाहने खरेदीसाठी सादर केलेल्या ११ कोटी ६४ लाखांच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. त्यानुसार पालिकेच्या भांडार विभागाकडून एकूण सात वाहने खरेदीसाठी नुकतीच निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात दोन अग्निशमन केंद्रासाठी दोन फायर वॉटर टेंड़र वाहने, दोन मल्टी पर्पस फायर टेंडर वाहने, एक वॉटर ब्राऊजर, दोन क्विक रिस्पोन्स वाहने अशी सात वाहने खरेदी केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली आहे. या वाहनांमुळे अग्नीशमन दल अधिक सक्षम होणार असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असेल.

Story img Loader