अंबरनाथ : गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने वाढलेले भटके श्वान आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणारे या श्वानांचे हल्ले पाहता पालिकेच्या निर्बिजीकरण यंत्रणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात होते. यापूर्वी पालिकेने नेमलेली संस्था प्रभावीपणे काम करत नसल्याचा ठपका ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने नव्या संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच निविदा जाहीर केली असून निर्बिजीकरणासोबतच जखमी श्वानांवर उपचार करण्याचाही समावेश त्यात करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्याचे दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांवर भटक्या श्वानांनी हल्ला केला होता. तर एका व्यक्तीवरही भटक्या श्वानांच्या टोळीने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. या घटनांमुळे अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर टीकाही केला जात होती. अंबरनाथ नगरपालिकेने एका संस्थेची नेमणूक भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी केली होती. मात्र ही संस्था प्रभावीपणे काम करू शकली नाही. त्यामुळे अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढतच होती. शहरातीव विविध भागात, विविध रस्त्यांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांच्या टोळ्या वावरत असल्याचे दिसून येते. निर्जन रस्त्यावर, वर्दळीच्या भागात एखाद्या दुचाकीवर या श्वानांच्या टोळ्या धावून जातात. त्यामुळे अनेकदा या दुचाकींचा तोल जाऊन अपघात होतो.
सकाळी लवकर आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर येणारे ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारे लहान विद्यार्थी तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर पडणारे नोकरदार यांनाही या भटक्या श्वानांच्या टोळ्या पार करत इच्छित स्थळ गाठावे लागते. त्यामुळे या भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी होत होती. गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता श्वान निर्बिजीकरण करणारी संस्था बदलण्याचे संकेत अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली होती. लोकसत्ताने हा प्रश्न सुरूवातीपासून लावून धरला होता. अखेर अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे, त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे आणि जखमी किंवा पिसाळलेल्या श्वानांवर जागेवर जाऊन किंवा केंद्रात आणून उपचार करणे या कामाकरिता अंबरनाथ नगरपालिकेने निविदा जाहीर केली आहे.