अंबरनाथ: शौचालयांमध्ये स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराला त्याच्या बिलाची रक्कम,  मिळवून देण्यासाठी एक लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या विलास भोपी या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विलास भोपी याने ३ लाख ७५ हजारांची लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हफ्ता स्वीकारताना ही अटक करण्यात आली. गेल्या महिनाभरात अंबरनाथ नगरपालिकेतील हा दुसरा कर्मचारी आहे जो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सापडला आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा आरोप होतो आहे. अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, साहित्य असा सर्व क्षेत्रात नगरपालिका स्तरावर प्रकल्प उभे केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘रेरा’ची मुदतवाढ ग्राहकांच्या मुळावर, ताबा लांबणीवर पडत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अंबरनाथ नगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरली जात असल्याचे चित्र आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचारी एकामागून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेतील कर विभागातील दीपक बोरसे या लिपिकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असताना नगरपालिकेतील लाचखोरी काही अंशी नियंत्रणात येईल अशी आशा होती. मात्र या घटनेच्या पंधरा दिवसानंतरच सोमवारी आणखी एका पालिका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. अंबरनाथ नगरपालिकेत विलास भोपी हे स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत द्राक्ष घेताना ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फेरीवाल्याला ग्राहकाने चोपले

नगरपालिकांच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता सांभाळणाऱ्या कंत्राटदाराचे ११ महिन्यांचे बिल अदा करणे प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी कंत्राट दाराकडे तीन लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील लाचेचा पहिला एक लाख ८५ हजार रुपयांचा हप्ता देण्याचे ठरले होते. मात्र एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी शक्य नसल्याचे सांगत कंत्राटदाराने एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबरनाथ पश्चिम येथील कोहजगाव येथे सापळा लावला. या सापळ्यात विलास भोपी एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विलास भोपी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही भोपी विविध कारणांमुळे वादात सापडला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath municipal council sanitary inspector arrested for taking bribe zws
Show comments