अंबरनाथः नव्या मालमत्तांचा समावेश आणि करवसुली करताना उचललेली महत्वाची पाऊले यामुळे यंदाच्या वर्षात अंबरनाथ नगरपालिकेने आपल्या एकूण मागणीच्या ९८ टक्के कर वसुली करण्यात यश मिळवले आहे. यंदा अंबरनाथ नगरपालिकेने ५० कोटी १३ लाख रूपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. तर शहरात ५ हजार १६० नव्या मालमत्ता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पालिकेची कराची मागणी थकबाकीसह ५२ कोटी रूपये इतकी होती.
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी यंदा जवळपास सर्वच पालिकांनी आक्रमक भूमिका घेतली. अंबरनाथ शहरात पालिका प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे ठोकले. तर मालमत्ता कर तातडीने भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षात अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात मालमत्ता धारकांनी करभरणा करण्याला चांगला प्रतिसाद दिला.
अंबरनाथ नगरपालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत मालमत्ता कर वसुलीच आहे. अंबरनाथ शहरात एकूण १ लाख २ हजार २५६ इतक्या मालमत्ता आहेत. यात जवळपास १ हजार मालमत्ता या लहान मोठ्या कंपन्या आहेत. औद्योगिक वसाहतीतून अंबरनाथ पालिकेचा मालमत्ता कराचा मोठा वाटा येत असतो. यंदाच्या आर्थिक वर्षात अंबरनाथ नगरपालिकेची मालमत्ता कराची मागणी थकबाकीसह ५२ कोटी इतकी होती. तर ३१ मार्च अखेरीस पालिकेच्या तिजोरीत ५० कोटी १३ लाखांचा कर जमा झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यात सुमारे साडे आठ कोटी रूपयांचा मालमत्ता कर भरणा हा ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर उर्वरित मालमत्ता कर विविध कार्यालयांमध्ये करण्यात आला. नव्याने मुख्याधिकारी पदावर विराजमान झालेल्या उमाकांत गायकवाड यांनी कर वसूलीत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मालमत्ता कर विभागाने ९८ टक्के वसूली केली. मालमत्ता कर विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये, प्रशांत राणे यांचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले जाते आहे.