अंबरनाथ: ज्या वालधुनी नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला अर्थात आत्ताच्या भारतीय रेल्वेने बंधारा बांधला, ज्या नदीवर शिलाहारकालीन शिवमंदिर आहे त्या नदीला नदी मानण्यात मात्र सर्व शासकीय यंत्रणा नकारघंटा देताना दिसत आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने वालधुनी नदीचा जलप्रवाह असा उल्लेख केला असून ती नदी प्रवर्गात येत नसल्याचा जलसंपदा विभागाचा दाखला देत नदीच्या उपनदीमध्ये सुरू असलेली बांधकामे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने वालधुनी नदीचा नाला असा उल्लेख करत तो प्रदूषण मुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आपल्या आराखड्यामध्ये व्यक्त केली होती.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात पूर्व भागात लोकनगरी परिसरात असलेल्या एका नैसर्गिक जलप्रवाहात सुरू असलेले संरक्षक भिंत बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले आहे. पर्यावरणप्रेमींनी या नैसर्गिक प्रवाहाला वालधुनी नदीचे उपनदी संबोधून यामध्ये सुरू असलेले बांधकाम बंद करण्याची मागणी केली होती. अंबरनाथ नगरपालिकेने सुरुवातीला हे काम तातडीने बंद केले. मात्र काही दिवसांपूर्वी बांधकामाबद्दल तक्रार करणाऱ्या अंबरनाथ सामुदायिक शेतकी सोसायटीला दिलेल्या पत्रात अंबरनाथ नगरपालिकेने या नैसर्गिक जलप्रवाहाला वालधुनी नदीची उपनदी संबोधन्यास नकार दिला आहे.
जलसंपदा विभागाने वालधुनी नदी हा जलप्रवाह असून ती नदी या प्रवर्गात मोडत नसल्याचे सांगितले आहे, असे अंबरनाथ नगरपालिकेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए आणि आता जलसंपदा तसेच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने वालधुनी नदीला नदीचा दर्जा देण्यास नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे अंबरनाथ नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी वालधुनी नदी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेऊन वालधुनी नदीचा बहुतांश भाग स्वच्छ केला होता. त्यानंतर वालधुनी नदीच्याच किनारी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी असा अंबरनाथ शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे. याच नदीवर रेल्वेच्या बाटली बंद पाण्याचा रेल नीर प्रकल्प सुरू आहे. असे असताना अंबरनाथ नगरपालिकेने वालधुनी नदीला नदीचा दर्जा नसल्याचे कारण देत तिला येऊन मिळणाऱ्या जलाप्रवाहाला उपनदी मानण्यास नकार देऊन नाल्यातील संरक्षक भिंतीचे काम सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
शिलाहार काळातील ज्या माम्वानी राजाने मंदिर बांधले त्याच राजाने ही नदी प्रवाहित केली. प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी जिथे खडक फोडले तिथे त्याचे पुरावे आहे. या नदीचे वय १०१० साली ही नदी असल्याचे पुरावे आहेत. ही नदी कुठून उगम पावली, त्याला येऊन मिळणारे जलप्रवाह याची आम्ही पाहणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी शेकडो विद्यार्थी घेऊन आम्ही परिक्रमासुद्धा केली आहे. त्यात पालिका प्रशासनाने सहभाग घेतला होता. – पूर्वा अष्टपुत्रे, वालधुनी अभ्यासिका
हेही वाचा – ठाणे, पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
शासकीय दस्तऐवजांमध्ये असलेला उल्लेख आम्ही केला. नदी असो वा नाला वालधुनी प्रदूषणाबाबत पालिका कायमच पुढाकार घेणार आहे. – डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
मुळात ज्या नदीच्या किनारी एवढी ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहेत त्या नदीला नदी म्हणून नाकारणे चुकीचे आहे. त्यातही नदी प्रवर्गात मोडत असो वा नसो तरीही नैसर्गिक जलप्रवाहमध्ये बांधकाम रोखण्यास असमर्थता दाखवणे तितकेच गंभीर आहे. – शशिकांत दायमा, पर्यावरण प्रेमी.