|| जयेश सामंत-सागर नरेकर
वाढीव चटईक्षेत्रास नगरविकास विभागाची मंजुरी
ठाण्यापाठोपाठ आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग नगरविकास विभागाने प्रशस्त केला असून येत्या काळात गृह विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनींवर अडीच चटईक्षेत्र निर्देशांक वापरून वसाहती उभ्या करता येणार आहेत. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत ही तरतूद समाविष्ट करण्यास नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली असून येथील पोलीस विभागाचा व्यापही यामुळे वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर येथील कर्मचाऱ्यांसाठी नव्या वसाहती उभारण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून विचाराधीन होता. पोलीस विभागाच्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी वसाहती उभारल्या जाव्यात अशी मागणी होत होती. राज्य सरकारने मध्यंतरी घेतलेल्या एका निर्णयानुसार पोलीस वसाहतींची पुनर्बाधणी तसेच नव्याने बांधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र अनुज्ञेय करण्याची तरतूद करण्यात आली होती. ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना ही तरतूद लागू असली तरी अंबरनाथ, बदलापूर अधिसूचित क्षेत्रात हा नियम लागू करण्यात आला नव्हता. या दोन्ही शहरात गृह विभागाच्या अखत्यारीत येणारी मोठी जमीन असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वसाहती उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या वसाहतींच्या उभारणीसाठी वाढीव चटईक्षेत्राची तरतूद लागू करावी अशी विनंती ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत नगरविकास विभागाकडे करण्यात आली होती. ही विनंती तातडीने मान्य करत नगरविकास विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी अंबरनाथ, बदलापूर अधिसूचित क्षेत्रात अडीच चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेतला आहे.
२४४ सदनिका उपलब्ध होणार
अंबरनाथ पोलीस ठाणे व तेथील कार्यालयांच्या इमारती जर्जर झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाची मागणी जोर धरत आहे. त्यानुसार पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय आणि निवासस्थानाच्या इमारतींसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यात आल्या. त्यानंतर नकाशे आणि त्यासाठीचे आराखडे तयार करण्याचे काम पोलीस गृहनिर्माण मंडळाला देण्यात आले होते. यात टाईप २ प्रकाराच्या २५ मजल्याच्या दोन इमारती उभारण्यात येणार असून प्रत्येक मजल्यावर ८ सदनिका असणार आहेत. तर टाईप ३ प्रकारात प्रत्येक मजल्यावर दोन सदनिका असणार असून एकूण २४४ सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध होणार आहेत. या बांधकामासाठी गृह विभागाने अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही अटींच्या अधीन राहून अडीच चटई क्षेत्रापर्यंतचे अतिरिक्त चटई क्षेत्र वापरणे योग्य होणार आहे. तसा आदेश स्थानिक अंबरनाथ नगरपालिकेला नगर विकास विभागाने दिले आहेत.