अंबरनाथः अंबरनाथ शहराला येत्या काळात क्रीडा नगरी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी शहरात येत्या काळात विविध खेळांसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या सुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली असून त्यासाठी निविदाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात अंबरनाथ शहरात खेळांडूंसाठी विविध मंच उपलब्ध होणार आहेत.
एकेकाळी रक्तरंजीत इतिहासामुळे चर्चेत असलेले अंबरनाथ गेल्या काही वर्षात सांस्कृतिक, क्रीडा आणि पायाभूत सुविधांमुळे चर्चेत आले आहे. राज्यातील जागतिक दर्जाचे शुटींग रेंज काही वर्षांपूर्वी अंबरनाथमध्ये सुरू करण्यात आले. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आज अंबरनाथमध्ये घेता येत असून त्याचा फायदा घेत अनेक खेळाडूंना आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवले आहे. शुटींग रेंजनंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध खेळांसाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. पश्चिमेला शुटींग रेंज शेजारी विमको नाक्याजवळ भव्य क्रीडासंकूल उभारले जाते आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी यासाठी १० कोटींचा निधी मिळवून दिला होता. त्यानंतर या क्रीडा संकुलाच्या कामाला सुरूवात झाली.
हेही वाचा >>> ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी शिवबंधनात
तीन टप्प्यांमध्ये विविध खेळांची मेैदाने या क्रीडा संकुलात उभारली जाणार आहेत. मात्र यासह शहरात इतर ठिकाणीही खेळांसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यास आतंरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव, हॉकी आणि क्रिकेट स्टेडीयम उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सर्व प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्याचा सर्वांगिण अभ्यास करणारे आणि या क्षेत्रातील अनुभव असलेले सल्लागार असणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला पालिकेत असलेल्या अभियंत्यांना त्याबाबत पुरेशी माहिती आणि अनुभव नाही. तसेच पालिकेशी करारबद्ध असलेले अनेक अभियंते यातील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थाची या कामी नेमणूक करण्यासाठी आता अंबरनाथ नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच येत्या तीन वर्षांसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. त्या सल्लागाराकडून शहराला क्रीडा नगरी म्हणून नावारूपाला आणण्याासाठी आवश्यक प्रकल्पांच्या उभारणीसाठी मदत घेतली जाणार आहे.
हेही वाचा >>> ‘केडीएमटी’ वातानुकूलित बसचा प्रवास स्वस्त; ‘केडीएमटी’च्या भाडे दरात आजपासून सुसुत्रता
प्रतिक्रियाः शहरात खेळासाठी विविध माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून अनेक क्रीडांगणे तयार केली जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची गरज असून त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.
– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.
अंबरनाथमध्ये उभ्या राहत असलेल्या क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यात विविध मैदाने उभारली जात आहेत. यात सिंथेटीक ट्रकपासून ते मातीतल्या खेळाच्या मैदानांचा समावेश आहे. भालाफेक, गोळाफेक या खेळांपासून बॅडमिंटन, टेनिसचे कोर्टही तयार केले जाणार आहेत. तीन टप्प्यांमध्ये हे क्रीडा संकूल उभे राहिल. तर सर्वेक्षण क्रमांक १३२ येथे क्रिकेटचे मैदान उभारण्याची पालिकेची तयारी आहे.